मुंबई : भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र शब्दांत देशातील जातीय हल्ल्याबाबत टिप्पणी केली आहे. या हल्ल्याकडे केवळ एक घटना म्हणून नव्हे, तर जातीय द्वेषाचा खुलेआम संदेश म्हणून पाहायला हवे, असे मत ॲड. आंबेडकर यांनी त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर व्यक्त केले आहे.
‘जातीय द्वेष आता चार भिंतींच्या बाहेर’
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये जातीय अत्याचाराच्या स्वरूपात झालेल्या बदलावर प्रकाश टाकला आहे. ते म्हणाले, जात-आधारित अत्याचार हे केवळ गावांमध्ये उघडपणे आणि हिंसक पद्धतीने लागू केलेल्या जाती व्यवस्थेचे क्रूर वास्तव म्हणून पाहिले जात होते. शहरांमध्ये, जातिभेद एक मूक मुखवटा घालून राहतो — कार्यालये, रुग्णालये आणि सरकारी कार्यालयांच्या चार भिंतींमध्ये लपलेला. पण आता तसे राहिले नाही.
‘हा एक संदेश आहे, पुढचा हल्ला आयएएस-डॉक्टरांवर होऊ शकतो!’:
ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हा हल्ला हे कटू सत्य सिद्ध करतो की जातीय द्वेष आता चार भिंतींच्या बाहेर आला आहे. देशातील सर्वोच्च संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला जातीच्या आधारावर लक्ष्य केले जात असेल, तर दलित आयएएस अधिकारी, डॉक्टर आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठी याचा काय अर्थ आहे, असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
यानंतर पुढचा हल्ला हा आयएएस अधिकारी, डॉक्टर आणि सरकारी अधिकाऱ्यांचा असू शकतो! ही केवळ एक घटना नाही. हा एक संदेश आहे! असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.