काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal) सत्तापालटाची मोठी घडामोड समोर आली आहे. सोशल मीडियावर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे Gen-Z (जनरेशन-झेड) तरुणांनी सुरू केलेल्या तीव्र आंदोलनानंतर (Agitation) माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. या राजकीय उलथापालथीनंतर नेपाळच्या अंतरिम पंतप्रधानपदी माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांची निवड करण्यात आली असून, त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत.
नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी सुशीला कार्की यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. या निवडीवर नेपाळमधील प्रमुख राजकीय पक्षांनी सहमती दर्शवली. सुशीला कार्की या अनुभवी राजकारणी असून, त्यांची ही नियुक्ती नेपाळसाठी ऐतिहासिक मानली जात आहे.
Gen-Z आंदोलनानंतरचा बदल:
केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जनतेचा मोठा रोष होता. विशेषतः भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदी यांसारख्या निर्णयांविरोधात देशात मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू झाले. या आंदोलनात Gen-Z तरुणाईने पुढाकार घेतला, ज्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली.
राजधानी काठमांडूसह अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने झाली, ज्यात सरकारी कार्यालये आणि नेत्यांच्या घरांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही आंदोलकांचा मृत्यू झाल्याने जनक्षोभ आणखी वाढला. वाढत्या दबावामुळे गृहमंत्री आणि कृषिमंत्र्यांनी आधीच राजीनामा दिला होता, आणि अखेर केपी शर्मा ओली यांनाही पंतप्रधानपद सोडावे लागले.
यादरम्यान, Gen-Z आंदोलनाचे नेते बालेन शाह आणि कुलमान घिसिंग यांच्या नावांची पंतप्रधानपदासाठी चर्चा होती. मात्र, राजकीय नेत्यांमध्ये एकमत झाल्यानंतर सुशीला कार्की यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.