मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी भेट घेतली. या भेटीत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी वंचित बहुजन आघाडीने केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले.
वंचितने केलेल्या मागण्या…
१. शासकीय अतिक्रमण जमीनधारकांच्या पिकाला संरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्या संदर्भातील निर्णय काढण्याचा आदेश त्यांनी ताबडतोब सचिवांना दिला.
२. महाराष्ट्रभर ग्रामीण भागात कुटुंब वाढल्यामुळे एका कुटुंबाची चार घरं झाली आहेत. जी नवीन घरं आहेत, त्यांना सुद्धा अतिक्रमण घरे म्हणून कारवाई केली जात आहे. पावसाळ्यात त्यांची घरे तोडली जाऊ नये. त्यावर ताबडतोब स्टे आणला जावा, अशी मागणी केली. तीही त्यांनी मान्य केली.
सोबतच ग्रामीण भागात गावठाणामध्ये ज्यांनी घरे बांधली आहेत. ग्रामपंचायत त्या घरांना अतिक्रमण ठरवतेय. त्यांना अतिक्रमण न ठरवता अधिकृत करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला.
३. नागपूर दीक्षाभूमी आंदोलन प्रकरणी कोणत्याही आंदोलकाला अटक केली जाणार नाही. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी नागपूर पोलीस आयुक्तांशी बोलून या प्रकरणात कोणालाही अटक केली जाणार नाही असा निर्णय घेतला.