नाशिक: महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक २१ (ड) च्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुप्रिया अहिरे यांच्या भावाला राजकीय सुडापोटी बेदम मारहाण करण्यात आली आहे. तसेच जातीवाचक शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.
“तुम्ही अनुसूचित जातीचे लोक जनरल जागेवर कसे उभे राहू शकता?” असा जातीवाचक सवाल करत ही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग २१ (ड) मध्ये वंचित बहुजन आघाडीचा वाढता प्रभाव पाहून प्रस्थापित गटांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. याच द्वेषातून उमेदवार सुप्रिया अहिरे यांच्या भावाला लक्ष्य करण्यात आले. मारहाण करणाऱ्यांनी केवळ शारीरिक इजा केली नाही, तर लोकशाहीने दिलेल्या अधिकारावरच गदा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
या घटनेवर नाशिक जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी म्हटले की, “ही घटना लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. अनुसूचित जातीच्या उमेदवाराने खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. प्रस्थापित शक्ती या अधिकाराला घाबरल्या असून त्यांनी आता दादागिरीवर उतरण्यास सुरुवात केली आहे.”
गांगुर्डे यांनी पुढे इशारा दिला की: “आम्ही असल्या दादागिरीला भीक घालत नाही. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांचे राजकीय धागेदोरे तपासावेत. जर दोषींना कडक शासन झाले नाही, तर वंचित बहुजन आघाडी संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडेल.”
जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे म्हणाले की, “जिल्हाध्यक्ष म्हणून मी प्रत्येक उमेदवाराच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. आम्ही या कृत्याचा निषेध करतो आणि अशा प्रवृत्तींना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही शेवटपर्यंत लढू आणि जिंकून दाखवू!”
मतदानाचा दिवस तोंडावर असतानाच या धक्कादायक घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. प्रस्थापितांकडून केलेल्या या हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र टीका केली जात आहे.






