जळगावात ‘वंचित’च्या सभेला मोठा प्रतिसाद !
जळगाव : नरेंद्र मोदी हे लोकशाहीतले, तर मोहन भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील हिटलर आहेत. असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर लगावला. ते जळगांव येथे सत्ता संपादन मेळाव्यात बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची या वर्षभरात कुठे भेट झालीय का? याचा खुलासा करा. विधानसभा आणि लोकसभा माणसांच्या पोटाचा प्रश्न आणि सुरक्षिततेचा प्रश्न सोडवतात. आज त्याला धार्मिक आखाडा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या पाकिस्तानने जगासमोर गूढघे टेकले, तुम्हाला त्या पाकिस्तानला गुढघ्यावर आणायला जमतं नाही. तुम्ही कसले राज्यकर्ते? असा प्रश्न देखील त्यांनी केंद्र सरकारवर उपस्थित केला.
कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर लागलेला अधिकारी, कर्मचारी हा सर्वात असुरक्षित आहे. या असुरक्षित अधिकारी, कर्मचाऱ्याला पक्षाच्यावतीने आश्वासन देतो की, उद्या सत्तेत वंचित बहुजन आघाडी सहभागी असेल तर त्याला पर्मनंट केलं जाईल. नव्या गुलामीची मानसिकता सध्या तयार केली जातं आहे. या मानसिक गुलामीला कॉन्ट्रॅक्ट पद्धत खतपाणी घालत आहे. वंचित बहुजन आघाडीला एकदा सत्तेत बसवा ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची गुलामी येथे राहणार नाही. असे आवाहनही ॲड. प्रकाश आंबेडकरांनी जळगाव येथील वंचित बहुजन आघाडी आयोजित सत्ता संपादन निर्धार सभेत केले.
केंद्रशासन हमीभाव जाहीर करते. पण व्यापारी हमी भावापेक्षा कमी भावात माल विकत घेऊन तो शेतकऱ्याला लुटत आहे. दुसऱ्या बाजुला शहरातील या मालाची खरेदी करणाऱ्या वर्गालादेखील व्यापारी लुटत आहेत. भाजपमधील आमदार, खासदार यांना आव्हान करतो की, मध्यंतरी टोमॅटोचा तुटवडा झाला. कुठल्या दिवशी आणि कोणत्या बंदरात तुम्ही टोमॅटो आणलं ते तरी सांगा ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
हे सरकार व्यापाऱ्यांच सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार नाही. निवडणुकीसाठी फंड पाहिजे म्हणून टोमॅटोचा तुटवडा केला आणि महिन्याभरात या सरकारने १८ हजार कोटी रुपये सामान्य माणसांचे लुटले. असा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे. सर्वसामान्यांच्या लुटीला हे सरकार पाठीमागे घालत आहे आणि म्हणून या पाठीमागे घालणाऱ्या सरकारला आपण मातीत मिळवलं पाहिजे.
हमीभावाच्या कायद्यावर बोलताना त्यांनी म्हटले की, शासनाने दिलेला हमीभाव शेतकऱ्यांना मिळवायचा असेल तर इथे बाजार समितीच्या कायद्यात बदल करावा लागेल. बाजार समितीच्या सभापती आणि डारेक्टर यांना हमीभावासाठी जबाबदार धरावे लागेल. व्यापारी हमीभावापेक्षा कमी भाव शेतकऱ्यांना मिळत असेल तर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा असे त्यांनी म्हटले.
भारतीय राज्यघटना वैदिक धर्मावर आधारित नाही तर, संतांच्या विचारांवर आधारित आहे. संतांची विचारसरणी ही समतावादी होती तर, वैदिक धर्माची विचारसरणी ही विषमतावादी होती. असेही त्यांनी यावेळी सांगितले
यावेळी जळगाव शहरातील पठाण बाबा टेकडी, महाबळ रोड येथे ही सभा पार पडली. या सभेला हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, युवा प्रदेश सदस्य शमीभा पाटील, चेतन गांगुर्डे, प्रा. लभाने, जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष संगीताताई साळुंखे, युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार, बाळा पवार यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते