नागपूर : विदर्भात सध्या मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून, गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला चांगलाच तडाखा दिला आहे. संततधार पावसामुळे शहराच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे.
काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे झाल झाले आहे. पावसाचा जोर इतका आहे की, अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.शहर परिसरातील काही नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.या गंभीर परिस्थितीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने आज नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून विदर्भात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. नागपूरसह गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांतही विदर्भात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.