मुंबई : मुंबई येथील ट्रायडेंड हॉटेलमध्ये महाविकास आघाडीसोबतच्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर गेले होते. बैठकीच्या नंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकरांना पत्र लिहून वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश केल्याचे कळवले.
या पत्रात महाविकास आघाडीने म्हटले आहे की, देश हुकूमशाहीकडे जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आणि लोकशाही पायदळी तुडवली जात आहे. ही परिस्थिती बदलून राज्यात आणि देशात परिवर्तन घडवावे यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली. आपण स्वतः देशातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहात. आम्ही आपले आभारी आहोत. वंचित बहुजन आघाडीने यापुढे महाविकास आघाडीमध्ये अधिकृतरित्या सहभागी व्हावे, अशी आमची भूमिका आहे. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामील व्हावे, यावर शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे.
हे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे ( UBT) नेते संजय राऊत, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांवर जाहीर केले आहे.
मुंबई येथील बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर सहभागी झाले होते. भाजप – आरएसएसला पराभुत करण्यासाठी आम्ही पुढील बैठकीत महाविकास आघाडीत सहभागी होणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.