मुंबई – मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्थांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या शालेय शिक्षण अभ्यास व कृती समन्वय समितीतर्फे आज दिनांक २९ जून २०२५ रोजी, दुपारी ३ वाजता, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात, तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात प्रतीकात्मक शासननिर्णय व परिपत्रकाची होळी व त्यानंतर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेला विविध राजकीय पक्षांचे नेते, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी संयोजक डॉ. दीपक पवार यांच्या आमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सभेत सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या सभेत प्रसिद्ध मराठी कवियत्री, लेखिका, पारलिंगी समूहाचा बुलंद आवाज, आणि केंद्रीय कार्यकारिणी सदस्य दिशा पिंकी शेख या प्रमुख प्रतिनिधी म्हणून आपले मत मांडतील.
त्यांच्यासोबत मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहनी, तसेच मुंबईतील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती राहणार आहे. या सभेद्वारे शालेय शिक्षणातील अन्यायकारक भाषा धोरणाविरोधात एकजूट दाखवून, मातृभाषा मराठीच्या हक्कांसाठी आवाज उठवला जाणार आहे.