Mumbai Dabbawala Service LPG Gas Shortage Impact: पश्चिम आशियातील इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा वणवा आता भारताच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. या जागतिक तणावामुळे देशात एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला असून, त्याचे थेट परिणाम मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या डबेवाला सेवेवर होताना दिसत आहेत.
व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे शहरांमधील अनेक हॉटेल्स, खानावळी आणि मेस चालवणे कठीण झाले आहे. पुरेशा इंधनाअभावी अनेक व्यावसायिकांनी आपले किचन तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा सर्वाधिक फटका डबा सेवा देणाऱ्या केंद्रांना बसला आहे.
इंडिया टुडेने या संबंधीचे वृत्त दिले आहे. डबेवाल्यांच्या प्रतिनिधींनी इंडिया टुडेशी बोलताना म्हटले की, एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे जे ग्राहक पूर्णपणे खानावळ किंवा कम्युनिटी किचनवर अवलंबून होते, त्यांची डब्याची सेवा खंडीत झाली आहे. यामुळे अनेक जणांनी डबा बंद केला आहे.
मुंबई डबेवाला असोसिएशनचे सचिव किरण गावंडे यांनी सध्याच्या संकटाबद्दल भाष्य करताना म्हटले की, गॅस सिलिंडरच्या कमतरतेमुळे आमच्या ग्राहकांच्या संख्येत कमालीची घसरण झाली आहे. पूर्वी आम्ही हजारो डबे रोज हाताळत होतो. आता त्यांची संख्या कमी झाली आहे. याचा आमच्या उत्पन्नावर थेट आणि तात्काळ परिणाम होत आहे.
या संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले, “मागच्या १५० वर्षांपासून डबेवाल्यांची सेवा अविरत सुरू आहे. मात्र गॅसच्या तुटवड्यामुळे पहिल्यांदाच आमच्या सेवेवर परिणाम झाला आहे. अनेक खानावळी बंद झाल्यामुळे डब्यांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. जर हीच परिस्थिती पुढेही कायम राहिली तर आम्हाला रोजचा खर्च काढणेही अवघड होईल.”
डबेवाल्यांची सेवा घेणाऱ्या एका ग्राहकाने सांगितले की, मी तीन वर्षांपासून डबेवाल्यांची सेवा घेत आहे. पण जेव्हापासून खानावळी बंद झाल्या आहेत, तेव्हापासून आम्हालाच जेवणाची व्यवस्था करावी लागत आहे. यामुळे एका बाजूला आमचा खर्चही वाढला आहे.
दुसरीकडे, टिफिन सेवा देणाऱ्या खानावळींनाही गॅसच्या टंचाईमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पूर्वी एका खानावळीत दररोज सुमारे १०० ते १२५ लोकांसाठी जेवण तयार केले जात होते, परंतु आता ही संख्या कमी होऊन फक्त ४० लोकांपुरती मर्यादित राहिली आहे.





