मुंबई : आपल्या मिश्किल आणि अष्टपैलू अभिनयाने बॉलिवूडमध्ये खास स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे आज (२० ऑक्टोबर) सायंकाळी ४ वाजता निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.’शोले’ चित्रपटातील “हम अंग्रेजों के जमाने के जैलर हैं!” हा अजरामर संवाद आणि त्यांची खास शैली आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या भूमिकेमुळे असरानी यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
गेल्या काही दिवसांपासून फुफ्फुसांच्या त्रासामुळे असरानी यांना मुंबईतील आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी व्यवस्थापक बाबूभाई थिबा यांनी दिली.
कॉमेडी आणि अभिनयाचा प्रवास:
गोवर्धन असरानी यांनी आपल्या पाच दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. ते सहजपणे मुख्य भूमिका, सहाय्यक भूमिका आणि विनोदी भूमिका साकारत असत. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत १९७२ ते १९९१ या काळात त्यांनी सुमारे २५ चित्रपटांमध्ये काम केले.
‘भागम भाग’, ‘हेरा फेरी’, ‘छुपके छुपके’, ‘खट्टा मिठा’ अशा अनेक चित्रपटांतील त्यांच्या विनोदी भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. कॉमेडीला एक वेगळी प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या या महान कलाकाराच्या जाण्याने बॉलिवूडमधील एक हास्याचा कंदिल आज विझला आहे.