मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आज उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानी १७,००० कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात छापा टाकला. सकाळी ७ च्या सुमारास, CBI चे अधिकारी कफ परेड येथील सीविंड निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी शोधमोहीम सुरू केली. या वेळी अंबानी आणि त्यांचे कुटुंब घरातच होते.
या प्रकरणात, स्टेट बँकेला सुमारे २००० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. जूनमध्ये, स्टेट बँकेने रिलायन्स कम्युनिकेशन (RCOM) आणि अनिल अंबानी यांच्या खात्यांना ‘फ्रॉड’ (Fraud) म्हणून घोषित केले होते. त्यानंतर बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) याबद्दल माहिती दिली.
RBI च्या नियमांनुसार, असा प्रकार लक्षात आल्यावर २१ दिवसांच्या आत तपास यंत्रणांना कळवणे आवश्यक असते.यापूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) या प्रकरणाच्या चौकशीसाठी अंबानी यांची अनेकदा चौकशी केली आहे. ५ ऑगस्ट रोजी, ED ने त्यांची जवळपास १० तास चौकशी केली होती.
याशिवाय, जुलैमध्येही त्यांच्या कंपन्यांशी संबंधित काही ठिकाणी छापे टाकले होते. ED ला संशय आहे की, येस बँकेने दिलेल्या ३,००० कोटी रुपयांच्या कर्जाचा गैरवापर झाला असून, तो निधी शेल कंपन्यांच्या माध्यमातून दुसरीकडे वळवण्यात आला असावा.