संजीव चांदोरकर
दहा हजारातील ९९९९ जणांना एमटीआर MTR ब्रँड माहीत असणार. पण दहा हजारातील फक्त एखाद्याला ORKLA या कंपनीचे नाव माहित असेल.
एमटीआर ही बंगलोर स्थित कंपनी १९२४ पासून, म्हणजे शंभर वर्षांपूर्वीपासून कार्यरत आहे. किंवा होती असे म्हणावे लागेल. एम टी आर या ब्रँडचे पदार्थ देशातील लाखो घरांमध्ये, विशेषतः दक्षिणेतील राज्यांच्या कुटुंबांमध्ये, गेली अनेक दशके वापरला जात आहेत. मसाले, चटण्या, रेडी टू इट पदार्थ असे जवळपास २७० प्रकार या एका ब्रँडखाली विकले जातात..
Orkla हा एक नॉर्वेजियन महाकाय उद्योग समूह आहे. तो खाद्यपदार्थ सह इतर अनेक उद्योगात कार्यरत आहे.
Orkla या समूहाने २००७ मध्ये एमटीआरची मालकी, त्यावेळच्या मालकांकडून ३५३ कोटी रुपयांचा एकरकमी चेक फाडून विकत घेतली. आणि नंतर त्यासाठी Orkla India Ltd ही भारतीय कंपनी पेरेंट नॉर्व्हेजियन कंपनीने स्थापन केली. ( या व्यवहारात जे पी मॉर्गन या अमेरिकन गुंतवणूकदार कंपनीने पाच वर्षात पाचशे टक्के नफा कमावला! )
अगदी आतापर्यंत Orkla India स्टॉक मार्केटवर लिस्टेड नव्हती. काही दिवसांपूर्वी या कंपनीने आपला आयपीओ बाजारात आणला. त्यातून २.२८ कोटी शेयर्स विक्रीला काढले आणि १६६७ कोटी कोटी रुपये उभे केले. हा आयपीओ ४९ पटींनी ओव्हर सबस्क्राईब झाला आहे.
एक रुपया दर्शनी मूल्याचा शेयर ओर्कला कंपनीने ७०० रुपयांना विकला आहे ; दहा रुपयांचा ७००० रुपयांना.
हे सारे पैसे ओर्कला कंपनीच्या खिशात गेले आहेत कारण पूर्ण इश्यू ऑफर फॉर सेल स्वरूपात होता. ऑर्कला कंपनीची ओरोजिनल गुंतवणूक आता किती पटींनी वाढली याची तुम्हीच कल्पना करू शकता
वर दिलेल्या आकडेवारीतून दिसणारी नफेखोरी डोळ्यात घुसणारी आहे. पण ही पोस्ट देशी / जागतिक कॉपरेट क्षेत्राच्या अफाट नफेखोरी बद्दल नाही.
दोन मुद्दे आहेत
पहिला मुद्दा
रेडी टू इट बाजारात एवढी महाकाय कॉर्पोरेटनी जम बसवण्याचा. ओर्काला हे एक उदाहरण आहे. या सर्व कॉर्पोरेट कडे एवढे भांडवल जमा होत आहे की प्रिडेटरी प्राइसिंग , धडाकेबाज जाहिराती, छोट्या दुकादारांना प्रचंड डिस्कॉउंट , आकर्षक पॅकेजिंग याद्वारे ते या उद्योगातील लाखो महिला केंद्री उद्योगांचा धंदा खाऊन टाकणार आहेत. त्यांना परिघाकडे चेपत नेणार आहेत. हे करण्यात ब्रेक इव्हन होईपर्यत पहिली काही वर्षं येणारा तोटा सहन करण्याची त्यांची क्षमता अफाट आहे. खाद्यपदार्थ क्षेत्रात देशी/ परकीय महाकाय कॉर्पोरेट ही विकेंद्रीत, महिला केंद्री खाद्यपदार्थ क्षेत्राची मृत्युघंटा सिद्ध होईल.
दुसरा मुद्दा.
मसाले काय किंवा खाद्यपदार्थांची रेसिपी. ही काय या कॉर्पोरेटनी प्रयोगशाळेत संशोधन करून बनवली? अक्षरशः शेकडो वर्षाच्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या आणि स्त्रियांच्या पिढ्यांनी विकसित केली आहेत. त्यांच्या पेटंट हक्काचे पैसे काय ही कॉर्पोरेट देणार आहेत. आयत्या बिळावर नागोबा आहेत ही सारी कॉर्पोरेट.
इथे स्त्रिया एक एक रुपया साठी जीव पाखडत आहेत. आणि तेथे स्त्रियांनी शेकडो वर्षे विकसित केलेल्या रेसिपीचा उपयोग करून कॉर्पोरेट हजारो कोटी रुपयांची कमाई करत आहेत…
स्त्रियांच्या संघटना, सेल्फ हेल्प ग्रुप यांनी खाद्य पदार्थ क्षेत्राच्या कॉर्पोरेटीकरणाचा इश्यु हातात घेतला पाहिजे. त्यांनी आपला ब्रेनवॉश केला आहे की सगळी खाजगी मालकी एकच. बिगर कॉर्पोरेट छोटी / मध्यम खाजगी मालकी आणि लिस्टेड/ कॉर्पोरेट खाजगी मालकी भिन्न आहेत. दुसरी खतरनाक ताकदीची आहे.





