जोपर्यंत बुद्ध धम्माचा प्रभाव समाजात होता, तोपर्यंत जातीव्यवस्थासुद्धा पक्क्या पद्धतीने प्रस्थापित होऊ शकली नाही. आजही बौद्ध धम्म ही भूमिका बजावू शकतो. पण त्याचा अंगीकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पद्धतीने होणे त्यासाठी गरजेचे आहे.
– डॉ. भारत पाटणकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह बुद्ध धम्माचा स्वीकार केला. बुद्ध धम्म स्वीकारताना त्यांनी स्वयंप्रकाशित पद्धतीने तो अंगिकारला. ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या आपल्या लिखाणात त्यांनी याविषयी सविस्तर आणि नेमकी मांडणी केली आहे. बाबासाहेबांनी केलेली मांडणी ही पारंपरिक धम्म अनुचरणाºयांना मान्य नाही. चीन, जपान, श्रीलंका इत्यादी देशातील बौद्ध बाबासाहेबांची मांडणी स्वीकारत नाहीत. ते बुद्ध विचारांपेक्षाही रूढी- परंपरांना जास्त महत्त्व देतात. बाबासाहेब मात्र शोषण मुक्तीचा, दु:ख मुक्तीचा विचार म्हणून बुद्धांच्या तत्त्वज्ञानाकडे पाहतात. नव्या समृद्ध, निरोगी आणि शोषणमुक्त व दु:खमक्त समाजाच्या निर्मितीसाठीचा विचार म्हणून पाहतात.
‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटले आहे की, ‘जर एखाद्या विज्ञाननिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल, तर त्याला बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही, असे माझे पक्के मत सर्व धर्माचा पस्तीस वर्षे सखोल अभ्यास केल्यावर तयार झाले आहे.’ ज्ञान प्राप्तीनंतरच्या पहिल्याच प्रवचनात गोतम बुद्ध, नव्या जीवनमार्गाच्या शोधाविषयी परिवाज्रकांना जे सांगतात ते बाबासाहेबांनी नमूद केले आहे. ‘…आपला जो मार्ग आहे, जो धम्म आहे, त्याला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही कर्तव्य नाही. त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही.
तसेच धम्माचा कर्मकांडाशी काही संबंध नाही.’ माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. धम्माचे हे पहिले अधिष्ठान आहे. मनुष्यप्राणी दु:खात, दैन्यात आणि दारिद्या्रत राहात आहे हे त्याचे दुसरे तत्त्व होय. हे सर्व जग दु:खाने भरले आहे, आणि जगातून हे दु:ख नाहीसे करणे हा एकच धम्म उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया होय. गोतम बुद्धांनी यासाठी अष्टांगिक मार्गाचा उपाय सांगितला. पंचशीलांचा उपदेश केला. त्यांनी नुकत्याच अंकुरु लागलेल्या जातीव्यवस्थेला विरोध केला.
वर्णीय उच्च-नीचतेचा विचार अनैसर्गिक, अवैज्ञानिक म्हणून सिद्ध केला. स्त्रियांना समान अधिकार आवश्यक असल्याच्या निष्कर्षाप्रत सुद्धा ते पोहोचले. माणसांना दास करण्याला सुद्धा त्यांनी विरोध केला आणि दासमुक्तीची दिशाही प्रत्यक्ष समाज बदलाच्या उपायांना अमलात आणण्याचा व्यावहारिक मार्ग सुचवून राबवली. त्यामुळे समाजाची एकंदर समृद्धी तर वाढलीच, पण दासांच्या मुक्ततेमुळे एका नव्या स्वातंत्र्याची अनुभूती समाजाला आली. जोपर्यंत बुद्ध धम्माचा प्रभाव समाजात होता, तोपर्यंत जातीव्यवस्थासुद्धा पक्क्या पद्धतीने प्रस्थापित होऊ शकली नाही. आजही बौद्ध धम्म ही भूमिका बजावू शकतो. पण त्याचा अंगीकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पद्धतीने होणे त्यासाठी गरजेचे आहे.
बौद्ध धम्माच्या परिषदा, मेळावे हे दु:खमुक्तीचे सामाजिक ध्येय गाठण्यासाठी होणे त्यामुळेच गरजेचे आहे. पण शोषणमुक्त समृद्ध निरोगी समाजाची निर्मितीच दु:खमुक्तीचे ध्येय साध्य करू शकते. आज असे होताना दिसत नाही. कर्मकांडी पद्धतीने व्यवहार करण्याचे प्राबल्य सर्वदूर प्रस्थपित झाले आहे. बाबासाहेबांचा मार्ग बाजूला टाकला गेल्याचेच प्रामुख्याने दिसते. तरुण पिढीने पुन्हा बुद्धाकडे, बाबासाहेबांकडे परतून, प्रबुद्ध होऊन दु:खमुक्तीचे ध्येय जिवंत केले पाहिजे. नवयान पुन: जनतेच्या हृदयात आणि मेंदूत भिनण्यासाठी जीवाचे रान केले पाहिजे. व्यवस्था बदलाच्या लढाईत तरुणाईची भूमिका येणाºया काळात महत्त्वाची ठरणार असल्याने वैचारिकदृष्ट्या मानवतावादी समाज निर्मितीसाठी त्यांनी झोकून देऊन काम करण्याची गरज निर्माण झाली आहे.
नाशिक: वंचित बहुजन युवा आघाडीच्या नेतृत्वाखाली त्रिरश्मी लेणी परिसरात भाविकांना भोजन वाटप
नाशिक : धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने नाशिक येथील त्रिरश्मी बुद्ध लेणी परिसरात दिवसभर अन्नदान...
Read moreDetails