पुणे : वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी पुणे येथील मॉडर्न कॉलेजवर एका माजी विद्यार्थ्याच्या यशासंदर्भात आवश्यक पूर्तता करण्यात अक्षम्य दिरंगाई केल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रेम बिऱ्हाडे नावाच्या माजी विद्यार्थ्याला लंडनमध्ये सुरक्षा सेवेसाठी नोकरी मिळाली असताना, कॉलेज प्रशासनाने दाखवलेली उदासीनता आणि दिरंगाई ही ‘वंचित समूहातून आलेल्या विद्यार्थ्यांचे यश पचवता न येण्यासारखी’ असल्याची टीका त्यांनी केली आहे.
अंजलीताई आंबेडकर यांनी समाज माध्यमांवर या संदर्भात आपली भूमिका मांडली. आपला माजी विद्यार्थी बाहेरच्या देशात असणे, ही खरंतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेसाठी अभिमानाची बाब असली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, प्रेम बिऱ्हाडेसाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात मॉडर्न कॉलेजने केलेली दिरंगाई अक्षम्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या भूमिकेवर आणि ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या ट्विटखालील प्रतिक्रियांवरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तिथे आरक्षण नसते, केवळ मेरिटवर जॉब मिळतो ह्या त्यातील सौम्य निर्बुद्ध प्रतिक्रिया! असे म्हणत, नोकरी केवळ गुणवत्तेवर (मेरिटवर) मिळत असल्याच्या प्रतिक्रियांचा त्यांनी समाचार घेतला.
प्रेमला जॉब मिळालेलाच होता पण, आपल्याच वंचित समूहातून आलेल्या विद्यार्थ्यांचे यश दुर्दैवाने कॉलेज प्रशासनाला पचवता आले नाही! हेच वास्तव आहे! या शब्दांत अंजलीताई आंबेडकरांनी कॉलेज प्रशासनाच्या हेतूवर शंका व्यक्त केली आहे.
हा प्रकार केवळ एका विद्यार्थ्याच्या भविष्याशी संबंधित नसून, वंचित समाजातील गुणवान विद्यार्थ्यांच्या यशाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब असल्याचे मत सामाजिक आणि राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.