मोबाइल रिचार्जच्या दरात लवकरच मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिचार्ज प्लॅन्सच्या किमती सुमारे १० ते १२ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
मे महिन्यात सक्रिय मोबाइल वापरकर्त्यांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ हे या संभाव्य दरवाढीमागील मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे.वापरकर्त्यांची वाढ आणि कंपन्यांचा आत्मविश्वासमे महिन्यात भारतात ७.४ दशलक्ष (७४ लाख) सक्रिय मोबाइल वापरकर्त्यांची वाढ झाली आहे. गेल्या २९ महिन्यांतील ही सर्वाधिक वाढ आहे.
या वाढीमुळे टेलिकॉम कंपन्यांना असा विश्वास वाटू लागला आहे की, ग्राहक आता वाढीव दरांचे प्लॅन्स देखील स्वीकारतील. विशेष म्हणजे, यावेळी दरवाढ केवळ बेसिक प्लॅन्सपुरती मर्यादित राहणार नाही. यापूर्वी, जुलै २०२४ मध्ये जेव्हा किमती वाढवण्यात आल्या होत्या, तेव्हा बेसिक प्लॅन्समध्ये ११-२३% वाढ झाली होती.
गेल्या काही महिन्यांपासून मोबाइल सिम कार्ड वापरकर्त्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. जुलै ते नोव्हेंबर या काळात २.१ कोटी वापरकर्ते कमी झाले असले तरी, आता सलग पाच महिन्यांपासून ही संख्या वाढत आहे. यामध्ये जिओने सर्वाधिक नवीन वापरकर्ते जोडले आहेत, तर एअरटेलने १३ लाख नवीन सक्रिय वापरकर्ते जोडले आहेत.
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, टेलिकॉम कंपन्या एक नवीन रणनीती आखण्याचा विचार करत आहेत, ज्याला ‘टायर्ड प्राइसिंग’ असे म्हटले जात आहे. या रणनीतीनुसार, सध्याच्या रिचार्ज प्लॅन्समध्ये उपलब्ध असलेल्या डेटाची मर्यादा कमी केली जाऊ शकते.
याचा अर्थ असा की, ग्राहकांना आता वारंवार डेटा पॅक रिचार्ज करावा लागू शकतो. कंपन्या लहान आणि स्वस्त डेटा पॅक देखील बाजारात आणत आहेत, जेणेकरून ग्राहक डेटा पॅकवर अधिक अवलंबून राहतील आणि यामुळे कंपन्यांना अतिरिक्त महसूल मिळू शकेल.