पुणे : १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी लाखो अनुयायी येणार आहेत. या सोहळ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. पुणे शहर पोलिसांनी सुरक्षेचे कडेकोट नियोजन केले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सोहळा शांततेत पार पडावा, यासाठी तब्बल साडेसात हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली आहे. शहर पोलीस दलातील ६,००० आणि बाहेरील जिल्ह्यांतून मागवलेले १,२०० पोलीस असा एकूण ७,२०० पोलिसांचा फौजफाटा तैनात असेल. (Bhima Koregaon)
पिंपरी-चिंचवडमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मुस्लिम समाजासोबत महत्त्वाची बैठक; नव्या समीकरणांची चर्चा
तसेच १,००० होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) तुकड्या मदतीला असतील. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विशेष ‘पोलीस टॉवर’ उभारण्यात आले असून ड्रोनद्वारे आकाशातून देखरेख केली जाणार आहे.
भीम अनुयायांना सोयीसाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. येणाऱ्या अनुयायांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. परिसरात २२ ठिकाणी प्रशस्त वाहनतळांची सोय करण्यात आली आहे. (Bhima Koregaon)
याशिवाय, येथील पोलिस टॉवर, ड्रोनद्वारे परिस्थितीवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. चोरीचे प्रकार रोखण्यासाठी विशेष पोलिस पथके नेमण्यात आली आहेत.
नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर रोजी अनुचित घटना घडू नये, स्वतंत्र बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरातील फर्ग्युसन रस्ता, महात्मा गांधी रस्ता, नळस्टॉप चौक, हडपसर अमनोरा, चांदणी चौक यासह विविध प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचित आणि काँग्रेस साथ साथ! ६२ जागांवर वंचित बहुजन आघाडी लढणार
या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून पाळत ठेवली जाणार आहे. शहरात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ मोहीम तीव्र करण्यात आली असून, ६० ठिकाणी नाकाबंदी करून मद्यपी वाहनचालकांची तपासणी सुरू आहे. वाहतूक शाखेकडून मागील वर्षभरात सुमारे साडेसहा हजार मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी प्रतिबंधात्मक कारवाई
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. सराईत गुन्हेगारांकडून मतदारांवर दबाव तंत्राचा वापर होऊ नये, तसेच निवडणूक प्रक्रियेत गुन्हेगारांचा सहभाग राहू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. (Bhima Koregaon)
गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखा, सातही पोलिस परिमंडळाकडून विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. पब्ज, बिअर बार आणि मद्यविक्रीच्या दुकानांवरही विशेष लक्ष ठेवले जात आहे. सुमारे पाच हजार सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, असे अमितेश कुमार यांनी सांगितले.






