हिंगोली : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हिंगोली येथील संविधान कॉर्नर, महात्मा गांधी चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला आणि पक्षप्रवेश सोहळ्याला हिंगोलीकरांनी प्रचंड गर्दी करत मोठा प्रतिसाद दिला. या जनसमुदायाच्या उपस्थितीत शेकडो युवकांनी सुजात आंबेडकर यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत पक्षाची ताकद वाढवली.
युवा नेते सुजात आंबेडकरांचे हिंगोलीकरांकडून उत्स्फूर्त स्वागत
कार्यक्रमाला हिंगोलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सभेला जमलेला हा जनसमुदाय वंचित बहुजन आघाडीच्या ‘फुले-शाहू-आंबेडकरवादी स्वाभिमानी शिलेदारांची’ ताकद दाखवून देणारा होता, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या: मीडिया ट्रायलवर उत्कर्षा रूपवते यांचा संताप; ‘गोपनीय माहिती माध्यमांपर्यंत कशी?’
सुजात आंबेडकर यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
यावेळी जनतेला संबोधित करताना सुजात आंबेडकर यांनी सत्ताधारी पक्षांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “हिंगोलीतील फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांच्या शिलेदारांची जमलेली गर्दी ही वंचित बहुजन आघाडीच्या विजयाचा निर्धार आहे.”
स्थानिक प्रश्नांना प्राधान्य: वंचित बहुजन आघाडी स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत शेतकरी, कष्टकरी आणि युवक यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान असो वा रोजगाराचा प्रश्न, यावर लढताना वंचित बहुजन आघाडीच जनतेसोबत उभी दिसते.
सत्तेचा वापर केवळ स्वार्थासाठी: राज्यातील सत्ताधारी पक्ष (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना-उबाठा आणि राष्ट्रवादी-शरद पवार गट) यांनी आतापर्यंत केवळ स्वतःचे खिसे भरण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठीच सत्तेचा वापर केला आहे, अशी टीका सुजात आंबेडकर यांनी यावेळी केला.
हा विश्वास आता महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निर्माण झाला आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या इतर पदाधिकाऱ्यांनीही आपले मत मांडले.
अशोक कांबळे (कळमनुरी तालुका अध्यक्ष):
“भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे सर्व प्रस्थापित पक्ष आतापर्यंत जनतेचे शोषण करत आले आहेत. पण या शोषणाविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे काम फक्त बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे.”
प्रबोधिनीताई खंडारे (हिंगोली जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी):
त्यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अधोरेखित केला. त्या म्हणाल्या, “देशात ओबीसी आरक्षण वाचले पाहिजे, यासाठी फक्त बाळासाहेब आंबेडकर लढत आहेत. आरक्षण वाचवायचे असेल, तर वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आता फक्त वंचित बहुजन आघाडीची सत्ता आणायची आहे.”
मुकुंद खरवंदे:
त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “येणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत. बाळासाहेब आंबेडकर गेल्या चाळीस वर्षांपासून बहुजन, वंचित, ओबीसी आणि शोषित समाजांना सत्तेत पोहोचवण्यासाठी लढा देत आहेत. म्हणून आता या लढ्याला साथ देण्यासाठी आपल्याला वंचित बहुजन आघाडीला भरघोस मतांनी विजयी करायचे आहे.”






