लातूर : वंचित बहुजन आघाडी (वंबआ) उदगीर यांच्या वतीने शहरात भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात विविध समाज घटकांतील शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश करत वंचित बहुजन आघाडीच्या कार्याला बळ दिले.
या सोहळ्यासाठी लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष सलीम भाई सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, उदगीर तालुका अध्यक्ष देविदास बोंबळीकर यांनी अध्यक्षस्थान भूषवले, तर तालुक्याचे महासचिव पी. डी. कांबळे हेदेखील यावेळी उपस्थित होते.
या पक्षप्रवेश कार्यक्रमात मुख्यतः महिला, भटकेनाथ जोगी समाज, कलाल समाज आणि मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. या सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला.
यावेळी तालुका आणि शहर कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे उदगीर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद आणखी वाढली असल्याचे बोलले जात आहे.