नवी दिल्ली: राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज सायंकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. लाल किल्याजवळ सायंकाळी ६.५२ मिनिटांनी भीषण स्फोट झाला. या घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या होत्या.
हा स्फोट इतका मोठा होता की, यामागे घातपात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाल किल्ल्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ उभ्या असलेल्या एका इको कारमध्ये हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, यामुळे आजूबाजूच्या ८ ते १० गाड्यांना आग लागून त्या खाक झाल्या.
सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून ते पाहणी करत आहेत.दिल्लीसह मुंबईत ‘हाय अलर्ट’या धक्कादायक घटनेनंतर दिल्ली शहरासह महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्येही ‘हाय अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. स्फोटानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रकाश आंबेडकरांकडून प्रतिक्रिया
या घटनेनंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे आणि दिल्लीतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे:
“आज रात्री दिल्लीतून आलेली बातमी खरोखरच दुःखद आहे. माझी आणि माझ्या पत्नी अंजलीची संवेदना स्फोटात प्राण गमावलेल्या आणि जखमींच्या कुटुंबियांसोबत आहेत, तसेच घटनास्थळी अथकपणे परिश्रम करणाऱ्या अग्निशमन दलाच्या आणि वैद्यकीय पथकासोबतही आहेत. आतापर्यंत या अपघातात १० लोक मारले गेल्याची, तसेच ३० लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.”





