लोकसभेच्या 42 जागा लढवणार : तृणमूल काँग्रेसचा एकला चलोचा नारा
कोलकाता : इंडिया आघाडी तळ्यात मळ्यात असताना आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी 42 उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाला विरोध करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्ष एकत्र आले होते. पण, आता ममता बॅनर्जी यांनी त्यांचे उमेदवार जाहीर केल्यामुळे इंडिया आघाडी पुन्हा बॅकफुटवर गेली आहे.
इंडिया आघाडीतून याआधी काही पक्षांनी काढता पाय घेतला होता. तृणमूल काँग्रेसही इंडिया आघाडीत सामील होती. मात्र, ममता बॅनर्जी यांनी एकला चलोचा नारा दिल्यामुळे इंडिया आघाडीचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, जागांवर एकमत न झाल्यामुळे त्यांनी एकला चलोचा नारा दिल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तृणमूल काँग्रेस पक्ष हा बंगालमधला सर्वांत मोठा पक्ष असून, पक्षाची बंगालमध्ये ताकद अधिक आहे. ममता बॅनर्जी इंडिया आघाडीत आल्यामुळे काँग्रेसला सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जातील अशी शक्यता वर्तवली जात होती. पण, त्यांनी इंडिया आघाडीला सोबत न करता लोकसभेसाठी 42 उमेदवार जाहीर केले आहेत.