मालेगाव : मालेगाव शहराला २९ सप्टेंबर २००८ रोजी हादरवून टाकणाऱ्या भीषण बॉम्बस्फोटाला उद्या (३१ जुलै) तब्बल १७ वर्षांनी न्याय मिळणार आहे. मुंबईतील एनआयए विशेष न्यायालयात या प्रकरणाचा निकाल लागणार असल्याने, ज्यांनी या स्फोटात आपले प्रियजन गमावले, त्यांच्या डोळ्यांत आजही आसवं आहेत आणि ‘आम्हाला इन्साफ मिळेल, न्याय होईल’ या आशेने त्यांच्या भेदरलेल्या नजरा निकालाची प्रतीक्षा करत आहेत.
भिक्खू चौकात झालेल्या या बॉम्बस्फोटात ६ निरपराध नागरिकांचे प्राण गेले, तर १०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली.
१७ वर्षांपूर्वीची ती दुर्दैवी सकाळ…
लियाकत शेख यांनी या स्फोटात आपली १० वर्षांची चिमुकली मुलगी फरहीन गमावली. फरहीन भिक्खू चौकात पाववडा आणण्यासाठी गेली होती, पण ती परतलीच नाही. बॉम्बस्फोटाची बातमी कळल्यावरही लियाकत शेख यांना आपली मुलगी घरी परत येईल अशी आशा होती. मात्र, काही वेळातच त्यांना फरहीनच्या मृत्यूची बातमी मिळाली. वडील म्हणून पत्नीसह मी तिथे बघायला गेलो, पण मला मुलीला पाहू दिले नाही, असं सांगताना लियाकत शेख यांचा कंठ दाटून येतो.
आजही ते आपल्या चिमुकलीचा एक छोटासा गोंडस फोटो हृदयाजवळ ठेवून तिची आठवण काढतात आणि ‘इन्साफ’ मिळेल, ज्यांनी हा बॉम्बस्फोट घडवून आणला त्यांना शिक्षा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करतात.
ट्रॅव्हल चालक शेख रफिक शेख मुस्तफा हे देखील या स्फोटाचे बळी ठरले. मुंबईला जाण्यासाठी निघालेल्या रफिक यांनी भिक्खू चौकात चहा घेतला आणि पान खाऊन ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार होते.
मात्र, त्याच क्षणी स्फोट झाला आणि त्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला. रफिक यांचे सासरे, शेख इब्राहिम, वृत्तपत्रातील जुनी कात्रणे आणि फोटो दाखवत ही घटना सांगतात. जावई आणि मुलगी आम्हा वृद्ध सासू-सासऱ्यांना सांभाळत होते. त्यांच्या मृत्यूनंतर आमचे खूप हाल झाले. आता आमचा नातू आम्हाला सांभाळत आहे, असं सांगताना त्यांचे डोळे पाणावतात.
जावयाच्या मृत्यूनंतर जो त्रास आम्हाला झाला, तोच त्रास बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्यांना झाला पाहिजे, तेव्हा आम्हाला न्याय मिळेल, अशी भावना शेख इब्राहिम यांनी भावविवश होऊन व्यक्त केली. मयत रफिक शेख यांच्या मुलानेही वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
शांतता आणि न्यायासाठीची लढाई
तत्कालीन जमीयत उलेमा संघटनेचे मौलाना अब्दुल कय्युम कासमी यांनी या बॉम्बस्फोटानंतर मृतांना आणि गंभीर जखमी झालेल्या नागरिकांना न्याय मिळावा यासाठी न्यायालयीन लढाईत मदत केली. शहरातील शांतता बिघडू नये यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. सुपारी फुटली तरी दंगे-फसाद होईल अशी परिस्थिती मालेगावात असताना, पोलीस प्रशासन आणि सरकारच्या आदेशाचे पालन करत आम्ही शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले, असे मौलाना कासमी म्हणाले. इन्साफ होना चाहिए ही आमची भावना आहे. पुन्हा त्यांनी अशी कृत्ये करू नयेत म्हणून त्यांना शिक्षा मिळणे गरजेचे आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या बॉम्बस्फोटात ज्यांची स्कूटर वापरली गेली त्या प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह कट रचणारे कर्नल पुरोहित, असिमानंद आदींसह त्यांचे सहकारी हे या बॉम्बस्फोटातील आरोपी असल्याचे वेगवेगळे पुरावे न्यायालयाकडे सादर करण्यात आले आहेत. हा कट कुठे रचला गेला, कोणी रेकी केली, आरोपींच्या लॅपटॉपमध्ये काय मिळाले, दूरध्वनी संवादात काय चर्चा झाली, याचे सर्व पुरावे एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे सादर करण्यात आल्याचे बॉम्बस्फोटानंतर सुरुवातीच्या काळात वकील म्हणून काम केलेल्या हमदानी इरफाना यांनी सांगितले.
त्यामुळे आरोपींना नक्की शिक्षा मिळेल. न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असे त्या म्हणाल्या. मालेगाव मध्यचे आजी-माजी आमदार यांनीही संविधान आणि न्यायालय यावर आमचा विश्वास आहे, नक्कीच आम्हाला न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया दिली. उद्याच्या निकालावर संपूर्ण मालेगाव शहराच्या, विशेषतः पीडित कुटुंबीयांच्या नजरा लागल्या आहेत.
धक्कादायक: मित्राच्या मोबाईल वापरावरून वाद, पुण्यात तरुणाची हत्या
पुणे : केवळ मित्राचा मोबाईल न विचारता वापरल्याच्या क्षुल्लक कारणावरून पुण्यात एका २५ वर्षीय तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात...
Read moreDetails