रेखाताई ठाकूर : पटोले कार्यकर्त्यांना गुलाम मानतात
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अकोला येथील कार्यकर्त्याच्या हातून पाय धुवून घेतल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी लक्ष वेधत म्हटले आहे की, या घटनेबद्दल वंचित बहुजन आघाडीला आश्चर्य वाटत नाही. नाना पटोलेंची कृती ही काँग्रेसमधील उचनीचतेच्या, भेदभावाच्या सरंजामी संस्कृतीला शोभणारे प्रच्छन्न प्रदर्शन आहे. कारण त्यांचा समतेवर विश्वास नाही.
पटोले हे आपल्याच पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला स्वतःचा गुलाम मानतात. म्हणूनच त्यांनी स्वतःचे घाणेरडे पाय हे कार्यकर्त्याला धुवायला लावले. नाना पटोलेंना वर्चस्ववादी वर्तनाबद्दल जेव्हा जेव्हा छेडले जाते, तेव्हा मी शेतकऱ्याचा पुत्र आहे अशी बतावणी ते करतात. परंतु, वारंवार ज्या आक्षेपार्ह घटना समोर येतात त्यातून हेच सिद्ध होते की मनुस्मृतीमधील विषमता यांच्या मनात घट्ट रुजलेली असल्याचेही ठाकूर यांनी म्हटले आहे.
मनुस्मृतीचा उघडउघड पुरस्कार करणाऱ्या भाजपपेक्षा हे काही वेगळे नाहीत. सर्व वंचित घटक हे यांची गुलामी करण्यासाठी आणि हे स्वतः मात्र सत्ता गाजवण्यासाठीच आहेत, या मनुस्मृतीच्या मूल्यांवर यांचा दृढ विश्वास आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी तरी नेत्यांचे अंधानुकरण व लाचारी सोडून दिली पाहिजे. नेत्यांच्या सरंजामी संस्कृती विरोधात संविधानाने दिलेल्या स्वाभिमानी समतेच्या मूल्यांवर आचरण करत आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवला पाहिजे, असेही ठाकूर यांनी म्हटले आहे.