तिवसा : बुद्धगया (बिहार) येथील पवित्र महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध जनतेकडे सोपवण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी सुरू केलेल्या जनजागृती अभियानाचा समारोप नुकताच बोर्डा येथे करण्यात आला. जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेल्या बुद्धगया येथील महाविहाराचे व्यवस्थापन सध्या मनुवाद्यांच्या हातात असून, ते बौद्ध समाजाकडे द्यावे अशी मागणी अनेक महिन्यांपासून भिक्खू संघाकडून करण्यात येत आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव साहेब आंबेडकर आणि युवानेते सुजात आंबेडकर यांनीही प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग घेतला आहे.
याच आंदोलनाला तिवसा तालुक्यातील बौद्ध जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी सागर भवते यांच्या नेतृत्वाखाली २० ऑगस्टपासून जनजागृती अभियानाला सुरुवात झाली होती. या अभियानादरम्यान तालुक्यातील विविध बुद्ध विहारांना भेटी देऊन जागृती करण्यात आली. यामुळे बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीचा विषय घरोघरी पोहोचला, असे मत जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम यांनी व्यक्त केले.
या समारोप कार्यक्रमात माथाडी कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष विनय बांबोळे, जेष्ठ नेते दादाराव गडलिंग, गुणवंत ढोणे, उपसरपंच संगीता नागदेवते, शहर उपाध्यक्ष शैलेश बागडे, जिल्हा सदस्य विनोद खाकसे, युवा तालुका अध्यक्ष सचिन जोगे, सामाजिक कार्यकर्त्या रुपाली मुंद्रे, भारतीय बौद्ध महासभेचे भारत दहाट आणि अनिल सोनोने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ वाचकांचा सत्कारही करण्यात आला.
बौद्ध विचारांचे खासदार गरजेचे
यावेळी बोलताना अभियानाचे आयोजक सागर भवते यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, “बुद्धगया महाबोधी महाविहार मनुवाद्यांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी कायद्यात बदल करणे आवश्यक आहे. हा बदल संसदेत घडवण्यासाठी सभागृहात केवळ बौद्ध जातीचे नव्हे, तर बौद्ध विचारांचे खासदार असणे गरजेचे आहे.”
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य प्रमोद मुंद्रे, डॉ. धर्मेंद्र दवाळे, मुकुंद पखाले, नितीन थोरात, प्रशांत सोनोने, प्रज्वल म्हात्रे, दिनेश दवाळे, धर्मापाल नागदेवते, जगदीश ढोणे, कृष्णा शेंडे, रामजी आढाऊ, शुक्राचार्य सोनोने, वर्षा दवाळे, मंदा म्हात्रे, छाया सोनोने आणि शिल्पा सोनोने, अर्चना काळबांडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सोनोने यांनी केले, तर अनिल पखाले यांनी उपस्थितांचे आभार मानले.