Maharashtra Monsoon : मुंबई, पुणे, आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. पुण्यात मुसळधार पाऊसाने झोडपून काढले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ढगफुटीसदृश्य पावसाने नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने आजही राज्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
प्रमुख जिल्ह्यांची स्थिती:
- पुणे आणि रायगड: या दोन जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
- बीड: येथे मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून बचावकार्य सुरू आहे.
- जालना: घनसावंगी तालुक्यात ढगफुटीसदृश्य पावसाने मोठे नुकसान झाले आहे.
- लातूर: तेरणा आणि मांजरा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
- मुंबई शहर आणि उपनगरे: मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे.
- रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग: मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
- सांगली, अहिल्यानगर (अहमदनगर) आणि नागपूर: या जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर कायम असून पुढील दोन दिवस नागपूरमध्ये पावसाचा तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाचा अंदाज:
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रायगड, पुणे घाटमाथा आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, बीड, बुलडाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, मान्सून बुधवारपर्यंत राजस्थान, गुजरात आणि पंजाबच्या काही भागातून माघार घेण्याचे संकेत आहेत. पूर्व विदर्भासह आजूबाजूच्या भागात सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.