मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात राडा पाहायला मिळाला. या निवडणुकीत शाई पुसण्यापासून ते ईव्हीएम बंद पडणे, पैशांची पाकिटे वाटणे आणि कार्यकर्त्यांमधील हाणामारी अशा अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.
मालेगावातून एक धक्कादायक बाब समोर आली. एकाच ठिकाणी ८०० हून अधिक मतदान कार्ड सापडली. हे मतदान कार्ड बोगस असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.
पिंपरीत मतदान केंद्रावर राडा
पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर मतदार यादीत नाव नाही. मतदार याद्या व्यवस्थित नाहीत, उमेदवाराला न विचारता EVM मशीन वरील स्टिकर निवडणूक विभागाने काढून टाकले, बदलले, असे आरोप करण्यात आले. निवडणूक आयोगाकडे याची तक्रारही केली होती. मात्र तक्रारीची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे थेट मतदान केंद्रावरच महिलेने राडा घालत निवडणूक आयोगाची गाडी रोखली.
ओळखपत्र नसल्याने मतदार माघारी
जळगाव शहरातील आर. आर. विद्यालय मतदान केंद्रावर सकाळपासूनच वातावरण तापले होते. काही संशयास्पद व्यक्ती बोगस मतदान करण्यासाठी येत असल्याचा दावा करण्यात आले. तक्रारीची दखल घेत निवडणूक अधिकाऱ्यांनी संशयित मतदारांची कसून तपासणी केली. तब्बल ४० ते ४५ मतदारांकडे वैध ओळखपत्रे नसल्याचे समोर आले, त्यामुळे त्यांना मतदान न करताच केंद्रावरून परत पाठवण्यात आले.
कार्यकर्त्यांमध्ये जुंपली
अकोला महापालिकेच्या प्रभाग १७ मधील भांडपुरा चौक परिसरात असलेल्या उर्दू कन्या शाळेत मतदानादरम्यान मोठा राडा झाला.
सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, मात्र किरकोळ कारणावरून दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, ज्यामुळे मतदान केंद्रावर एकच पळापळ सुरू झाली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि बळाचा वापर करून जमावाला पांगवण्यात आले.
या गोंधळामुळे निवडणूक आयोगावर चहूबाजूंनी टीका होत आहे. ही निवडणूक केवळ बोटाला लावलेली शाई पुसण्याची नसून, लोकशाही पुसून टाकण्याचा एक डाव आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटत आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे दिसले.





