नवी मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारची पोलखोल करताना महत्वाची माहिती निदर्शनास आणून दिली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, जागतिक बँकेने सांगितलं की, देशावर मोदी सरकार येण्याअगोदर प्रत्येक व्यक्तीवर 100 पैकी 24 ते 25 रुपये कर्ज होते. या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे 24 रुपयांचे कर्ज 84 रुपयांवर नेले आहे. ते वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या सत्ता परिवर्तन महासभेत बोलत होते.
ते म्हणाले, धाडी घालणं हा शासनाचा अधिकार आहे, पण ज्यांच्यावर तुम्ही धाडी घातल्या त्यापैकी किती जणांना कोर्टाने शिक्षा सुनावली की, त्यांनी चोरी केली आहे म्हणून ? ज्याप्रमाणे गंगेत स्नान केले की पापमुक्त होते असे म्हटले जाते, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षात गेले की, चोर हा साव होतो, अशी परिस्थिती असल्याचे आंबेडकर म्हटले.
मोदी म्हणतात की, देश माझा परिवार आहे, ते पूर्णपणे खोटारडे आहे. दुर्दैव हे आहे की, विरोधी पक्ष त्यांचा खोटारडेपणा समोर आणत नसल्याची टिका त्यांनी केली. मी इथल्या सनातन्यांना विचारतोय की, कोणत्या तोंडाने म्हणाल की, मोदीला मत द्या.त्यांच्या कालावधीत हिंदूंचे सरकार आहे. पण स्थलांतर कोण करत आहे ? नागरिकत्व कोण सोडत आहे ? तर हिंदू हा नागरिकत्व सोडत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
सामान्य माणसांनी घाबरायचे कारण नाही. कारण आपल्या घरात सोनं, नानं आणि नोटा नाहीत, पण इथल्या व्यापाऱ्यांनी घाबरले पाहिजे हे लक्षात घ्या. आतापर्यंत व्यापारी भाजप आणि आरएसएसला पैसा आणि देणगी देत होता. या व्यापारी वर्गाला माझं सांगणं आहे की, या पाच वर्षांत तुम्ही मोदीच्या हातात कारभार दिला, तर तुमच्या घरासमोर ईडी आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या असा इशाराही त्यांनी दिला.
अधिकारी कोर्टासमोर सुद्धा खरे बोलू शकत नाही इतके भय यांनी निर्माण केले. देशाची व्यवस्था त्यांनी एवढी बिघडवली आहे की, मुख्य न्यायाधीशाला म्हणावं लागले की, मी आता इथला निवडणूक अधिकारी आहे. म्हणजे यांनी एवढे भय निर्माण केले आहे की, अधिकारी कोर्टासमोर सुद्धा खरे बोलू शकत नाही असे आंबेडकर म्हटले.
आंबेडकर म्हणाले, “ना खाउंगा, ना खाने दुंगा” अशी जी घोषणा आहे, लेकीन मै खाते रहुंगा तिला खऱ्या अर्थाने व्यवहारामध्ये उतरवले आहे. एक नवा हुकूमशहा आपण निर्माण केला आहे हे लक्षात घ्या.भाजपने आश्वासन दिलेले दिसते आहे की, तुम्ही चोऱ्यामाऱ्या करा आणि भारतीय जनता पक्षात या तुमचे पाप धुतले जातील अशी खोचक टीका त्यांनी केली.
या सभेला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.