कोल्हापूर : ‘वंशाचा दिवा मुलगाच असावा’ या जुन्या सामाजिक परंपरेला छेद देत, कागल तालुक्यातील एका कन्येने आपल्या दिवंगत वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग देऊन एक नवा आदर्श घालून दिला आहे. तिच्या या धाडसी निर्णयाचे आणि कार्याचे संपूर्ण गावात आणि परिसरात कौतुक होत आहे.
केंबळी गावातील शेतकरी बाळूभाऊ कांबळे (वय ७३) यांचे मंगळवारी (दि.१९) सकाळी निधन झाले. बाळूभाऊंच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि तीन मुली होत्या; त्यांना मुलगा नव्हता. त्यांनी आयुष्यभर शेतमजुरी करून आपल्या मुलींना शिकवले, मोठे केले आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. त्यांच्या तीन मुली, शीतल, प्रियंका आणि सारिका यांनी वडिलांची जबाबदारी स्वीकारली.
वडिलांच्या निधनानंतर, तिन्ही बहिणींनी मिळून ‘आपणच वंशाचा दिवा आहोत’ असा विचार करत, वडिलांचे अंत्यसंस्कार स्वतःच्या हाताने करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, मधली मुलगी प्रियंका दीपक कांबळे यांनी वडिलांच्या मुखात पाण्याचे थेंब टाकले आणि त्यानंतर त्यांना अश्रूपूर्ण नयनांनी अग्निडाग दिला. प्रियंका या वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर जिल्हा महासचिव दीपक कांबळे यांच्या पत्नी आहेत.
मुलींच्या या निर्णयामुळे आणि कृतीमुळे समाजात मुलींच्या समान हक्कांबाबत असलेला दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल, असा संदेश दिला गेला आहे. ‘सावित्रीच्या लेकींनी आपले कर्तव्य योग्यरित्या पार पाडले’ अशा भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या. या घटनेचे सर्वत्र समाधान व्यक्त होत असून, मुलींच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
२ वर्षांपासून सारथीची फेलोशिप ठप्प, तर महाज्योतीचे विद्यावेतनही केले बंद
आर्थिक अडचणीमुळे शहरातील त्रस्त विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात औरंगाबाद : मराठा आंदोलन तीव्र झाल्यानंतर राज्य सरकारने सारथीअंतर्गत राबवलेल्या योजनांचे बॅनर शहरात...
Read moreDetails