अकोला : धाडी-बल्लाळी गावात अनेक नागरिक किडनीच्या विकाराने त्रस्त असून, दूषित पाणी आणि इतर समस्यांमुळे आतापर्यंत ७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या धक्कादायक घटनेनंतर वंचित बहुजन युवा आघाडीने तात्काळ ‘ॲक्शन मोड’मध्ये येत जिल्हा परिषद पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता मिलिंद जाधव यांच्यासह गावाला भेट दिली आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
सात जणांचा बळी; १२ जणांवर उपचार
स्थानिक वंचित युवा आघाडीचे कार्यकर्ते लखन चव्हाण आणि अजय बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, किडनीच्या आजाराने गावात कंकुला शिंदे, कमला शिंदे, ज्ञानदेव शिंदे, निर्मला साळुंके, प्रभा शिंदे, लाला शिंदे, प्रमिला बाबर, आणि धर्मा शिंदे यांचा मृत्यू झाला आहे. सध्या इमला शिंदे, प्रल्हाद बाबर, भागा माळवे, संजय बाबर, बाबुराव बाबर, शोभा शिंदे, गिता बाबर, मोतीराम शिंदे, शंकर बाबर, गंगा शिंदे आणि हरा बाबर यांच्यावर उपचार सुरू आहेत.
४ दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देशगावकर्यांच्या आरोपानुसार, दूषित पाण्यामुळे हे किडनीचे विकार बळावले आहेत. गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत विहीर तयार असून पाईपलाईनही टाकण्यात आली आहे, परंतु पाणीपुरवठा सुरू झाला नव्हता. या गंभीर समस्येची दखल घेत वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे आणि जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे यांनी कार्यकारी अभियंता मिलिंद जाधव यांच्यासमोर तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची आणि युद्धपातळीवर काम करण्याची मागणी केली.
या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत कार्यकारी अभियंता मिलिंद जाधव यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना उद्यापासूनच काम सुरू करून चार दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले आहेत.
आरोग्य तपासणी शिबिराचा निर्धार
पाणीपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासोबतच, युवा आघाडीने लवकरच गावात आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून नागरिकांची तपासणी करून घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या भेटीदरम्यान युवा आघाडीच्या नेत्यांनी नुकत्याच दिवंगत झालेल्या प्रमिला मोहन बाबर यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. तसेच, मीरा शंकर बाबर, विमल गोविंदा शिंदे, शशिकला प्रल्हाद बाबर आणि शोभा सुरेश बाबर यांच्यासह अनेक गावकऱ्यांशी राजेंद्र पातोडे यांनी चर्चा केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, तालुका अध्यक्ष सुगत डोंगरे, अमोल वानखडे, सचिन शिराळे, विजय पातोडे, जय तायडे, नागेश उमाळे, राजदार खान, राहुल कळंब, श्रीकृष्ण देव कुणबी, निशिकांत सरदार, सोनु डोंगरे, पीयूष पवार, युवराज डोंगरे, प्रकाश अंभोरे, संकेत डोंगरे, श्रीकृष्ण पातोडे, अमोल डोंगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.