जालना : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मौजे भोगाव येथे जातीय द्वेषातून बौद्ध समाजाच्या शेतकऱ्यांची तब्बल ४० एकर ऊस शेती जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने घनसावंगी तहसील कार्यालयासमोर आक्रमक निदर्शने करत जोरदार आंदोलन केले.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, भोगाव येथील बौद्ध समाजाच्या शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस अज्ञात समाजकंटकांनी जातीय मानसिकतेतून पेटवून दिला. यामध्ये सुमारे ४० एकर ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरली आहे.

आंदोलनादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी आरोप केला की, “जळालेला ऊस कारखान्यापर्यंत नेण्यासाठी साखर कारखान्याचे चेअरमन आणि संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक विलंब करत आहेत. तसेच, या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्यासही पोलीस प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे.”
तहसीलदारांना निवेदन सादर करताना आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला की, जर पीडित शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला नाही आणि आरोपींना त्वरित बेड्या ठोकल्या गेल्या नाहीत, तर वंचित बहुजन आघाडी राज्यभर अधिक तीव्र आंदोलन छेडेल.

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके, जिल्हाध्यक्ष रामप्रसाद थोरात, परमेश्वर खरात, देविदास कोळे, चोखाजी सौंदर्य, हनुमंत मोरे, समाधान तोडके, बाबासाहेब गालफडे, बाबासाहेब सोनवणे, सतीश पट्टेकर, संतोष येडे, गौतम पटेकर यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचे पदाधिकारी व शेकडो महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.






