मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांना थेट प्रश्न विचारत भारताच्या परराष्ट्र धोरणांवर गंभीर आरोप केले आहेत.अमेरिकेच्या दबावाखाली येऊन केंद्र सरकार देशाचे सार्वभौमत्व आणि रशियासोबतचे जुने मैत्रीपूर्ण संबंध धोक्यात घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ॲड. आंबेडकरांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत :
१) अमेरिका (United States) भारताच्या परराष्ट्र आर्थिक धोरणांवर हुकूमशाही करत आहे का?
२) तुम्ही आमचं सार्वभौमत्व वॉशिंग्टनच्या मर्जीवर सोडलं आहे का?
३) फक्त अमेरिकेला खूष करण्यासाठी तुम्ही रशियासोबतचे आमचे जुने आणि चांगले मैत्रीचे संबंध धोक्यात घालत आहात का?
४) तुम्ही ट्रम्पच्या धमकावण्यापुढे झुकून भारताचे दीर्घकालीन हितसंबंध सोडले आहेत का?
या आरोपांची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी देशाला उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. ही बाब ‘खूप, खूप गंभीर’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ॲड. आंबेडकर यांनी यापूर्वीही केंद्र सरकारच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांवर टीका केली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेले ५०% टेरिफ शुल्क आणि रशिया, चीनकडे झुकणे हे मोदी सरकारच्या अमेरिकेला आणि रशियाला संतुलित ठेवण्यात आलेल्या अपयशाचे परिणाम असल्याचे मत त्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. त्यांच्या मते, भारताचे असंतुलित धोरण देशाच्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांसाठी हानिकारक आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच जाहीर केले आहे की, भारत रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करणार नाही. हे भारताने अमेरिकेला सांगितले आहे. त्यावरून मोठे वादंग माजले आहे.