नवी दिल्ली : रिलायन्स एडीएजी समुहाचे प्रमुख, उद्योगपती अनिल अंबानी यांना १७,००० कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं, त्यानुसार ते आज दिल्लीतील ईडी कार्यालयात पोहोचले.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणात अनिल अंबानींच्या रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (आरएचएफएल), रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (आरसीएफएल), आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) या कंपन्यांचा सहभाग आहे. या कंपन्यांनी अनेक बँकांकडून हजारो कोटी रुपयांची कर्जे घेतली होती, पण ती योग्य कारणांसाठी वापरली नाहीत असा आरोप आहे.
ईडीच्या तपासानुसार, या कंपन्यांनी घेतलेले कर्ज शेल कंपन्यांद्वारे दुसरीकडे वळवण्यात आले. तपासात बनावट कागदपत्रे आणि बँक गॅरंटीचा वापर झाल्याचंही समोर आलं आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) ही चौकशी सुरू आहे.
या प्रकरणात सुमारे २० सरकारी आणि खाजगी बँकांचे कर्ज अडकले आहे, जे आता ‘एनपीए’ (नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स) मध्ये बदलले आहे. ईडीच्या अहवालानुसार, आरएचएफएलवर सुमारे ५,९०१ कोटी, आरसीएफएलवर ८,२२६ कोटी आणि आरकॉमवर ४,१०५ कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज थकीत आहे.
अनिल अंबानींची चौकशी झाल्यावर ईडी आता कर्ज देणाऱ्या बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावू शकते. या बँकांमध्ये येस बँक, एसबीआय, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, बँक ऑफ इंडिया, यूको बँक आणि पंजाब अँड सिंध बँक यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांकडून कर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया, कर्ज थकीत होण्यामागची कारणे आणि त्यानंतर केलेल्या कारवाईची माहिती घेतली जाईल.