इंदूर : इंदूरहून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या एका विमानाला तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या घटनेमुळे विमानात असलेल्या प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.
सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो या विमानाने इंदूरच्या देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीसाठी उड्डाण केले. मात्र, उड्डाण केल्यानंतर काही वेळातच वैमानिकाला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले.
कोणताही धोका न पत्करता वैमानिकाने तातडीने एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क साधला आणि इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली.एटीसीने तातडीने प्रतिसाद देत विमानाला इंदूर विमानतळावर परत येण्याची परवानगी दिली.
त्यानंतर, वैमानिकाने अत्यंत कौशल्याने आणि धैर्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले. विमान सुरक्षितपणे उतरल्यानंतर प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले. तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.