दक्षिण कोरिया : भारताची पॅरा तिरंदाज शीतल देवीने दक्षिण कोरियाच्या ग्वांगजू येथे झालेल्या पॅरा वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत विश्वविजेतेपद पटकावले आहे. आपल्या दोन्ही हातांचा वापर न करता केवळ पाय आणि हनुवटीच्या मदतीने नेम साधणाऱ्या शीतलने वैयक्तिक कंपाउंड प्रकारात तुर्कीयेच्या अव्वल खेळाडू ओझनूर क्युर गिर्डीचा १४६-१४३ असा रोमहर्षक पराभव केला आणि सुवर्णपदकावर नाव कोरले.
शीतल देवी या स्पर्धेत दोन्ही खांद्यापासून हात नसलेली एकमेव खेळाडू आहे. तिच्या या अपवादात्मक विजयामुळे तिची मानसिक कणखरता आणि अचूक तांत्रिक कौशल्य सिद्ध झाले आहे. वैयक्तिक सामन्याच्या अंतिम फेरीत तिने त्याच ओझनूर क्युर गिर्डीला हरवले, जिच्याकडून तिला आणि तिच्या जोडीदार सरिताला सांघिक महिला ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता.
या पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये शीतल देवीने एकूण तीन पदके जिंकली आहेत:
सुवर्णपदक – वैयक्तिक कंपाउंड महिला ओपन.
रौप्यपदक – महिला सांघिक ओपन (सरितासोबत).
कांस्यपदक – मिश्र सांघिक (तोमन कुमारसोबत).
मिश्र सांघिक स्पर्धेत शीतल आणि तोमन कुमार यांनी ग्रेट ब्रिटनच्या जोडीला नमवून कांस्यपदक जिंकले होते. सांघिक महिला ओपन स्पर्धेत अंतिम फेरीत तुर्कीयेच्या जोडीकडून पराभूत होऊनही त्यांनी रौप्यपदक मिळवले. तुर्कीयेच्या ओझनूर क्युर गिर्डी आणि बुर्सा फातमा यांच्या जोडीने तो सामना १४८-१५२ ने जिंकला होता. सांघिक सामन्यातील पराभवाने खचून न जाता, शीतलने वैयक्तिक स्पर्धेत याच ओझनूरला हरवून आपले कर्तृत्व सिद्ध केले.
दुर्मिळ आजारावर मात करत पॅरा आर्चरीमध्ये आगमन
१० जानेवारी २००७ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाडमधील लोईधर गावात जन्मलेल्या शीतल देवीला फोकोमेलिया नावाचा दुर्मिळ आजार आहे, ज्यामुळे तिच्या हातांचा विकास पूर्णपणे झाला नाही. मात्र, या शारीरिक व्यंगाला तिने कधीही अडथळा मानले नाही.
२०२१ मध्ये जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने आयोजित केलेल्या एका युवा कार्यक्रमात तिच्यातील आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती लष्करी प्रशिक्षकांच्या लक्षात आली. त्यानंतरच शीतलच्या पॅरा तिरंदाजीतील प्रवासाची सुरुवात झाली. आज तिने विश्वविजेतेपद जिंकून जगाला दाखवून दिले आहे की इच्छाशक्तीसमोर कोणतीही मर्यादा नसते.