परळी – वंचित, शोषित, पीडित आणि उपेक्षित घटकांना न्याय मिळावा या उद्देशाने परळीत वंचित बहुजन आघाडीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयाच्या माध्यमातून वंचित घटकांना न्याय मिळेल, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष शैलेशभाऊ कांबळे यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी शैलेश कांबळे आणि जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना शैलेशभाऊ म्हणाले की, “प्रत्येक पदाधिकाऱ्याने वंचित समाजाच्या सुखदुःखात सहभागी होऊन, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ताकदीने भाग घ्यावा आणि समाजाला प्रतिनिधित्व मिळवून द्यावे.” यावेळी मिलिंद घाडगे यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित करून संघटनेच्या कार्याचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाला सचिन उजगरे, अजय सरवदे, खंडू जाधव, प्रसन्नजीत रोडे, संजय नाकलगावकर, लखन काका जोगदंड, हनुमंत वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. गौतम साळवे यांनी कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले, तर आभार राजेश सरवदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. परिसरातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला भरभरून पाठिंबा दिला.