हिंगणघाट : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहराला गेल्या दोन दिवसांपासून दोन वेगवगळ्या घटनांनी हादरवून सोडलं आहे. पोळ्याच्या सणादरम्यान दोन दिवसांत दोन मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या दोन्ही घटनांची नोंद पोलिसांनी घेतली असून, तपास सुरू आहे.
शुक्रवारी सायंकाळी हिंगणघाट शहरातील इंदिरा वॉर्डमध्ये एका महिलेची हत्या झाल्याचं समोर आलं. सुभाष लक्ष्मण वैद्य नावाच्या व्यक्तीने आपली पत्नी माधुरीचा खून करून तिचा मृतदेह घराजवळील एका रिकाम्या जागेत पुरला. पती-पत्नीमधील वादामुळे ही हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरीच्या आई-वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला असता, जळालेल्या अवस्थेत माधुरीचे कपडे आणि इतर वस्तू आढळल्या. संशय आल्याने पोलिसांनी परिसरातील माती खणली असता, दहा फूट खोल खड्ड्यात पुरलेला माधुरीचा मृतदेह आढळला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी सुभाषने जेसीबीच्या मदतीने हा खड्डा खोदला होता.
या प्रकरणी पोलिसांनी सुभाषच्या मामाला ताब्यात घेतलं असून, मुख्य आरोपी सुभाष हा अजूनही फरार आहे. आज सकाळी हिंगणघाट तालुक्यातील धांबा गावाजवळच्या एका नाल्यात एका अनोळखी युवकाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला आहे.
मात्र, अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही.या युवकाचा मृत्यू नेमका कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही हत्या आहे की आत्महत्या, याबाबत पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.