अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
मेळाव्यासाठी आलेल्या सुजात आंबेडकर यांचे उपस्थितांनी ठिकठिकाणी जोरदार स्वागत केले. त्यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
मेळाव्याच्या विचारमंचावर तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सुजात आंबेडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या या पवित्र दिनी मोठ्या संख्येने उपासक आणि अनुयायी या मेळाव्यात सहभागी झाले होते. हा मेळावा अकोला शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.