अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी प्रमुख उपस्थिती लावली. अंजलीताईंच्या व्यासपीठावरील आगमनाने आंबेडकरी अनुयायी आणि बौद्ध बांधवांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
यावेळी बोलताना अंजलीताई आंबेडकर यांनी उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. बाबासाहेबांचे विचार केवळ भाषणांपुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याचे आवाहन त्यांनी केले.
त्या म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रबुद्ध भारत करायचा होता. प्रबुद्ध म्हणजे स्वतः प्रबुद्ध होऊन जगण्यात प्रज्ञावंत होणे. अंजलीताईंनी उपस्थितांना कोणत्याही घटनेकडे डोळसपणे बघितले पाहिजे आणि डोळसपणे जगण्यासाठी आजूबाजूला काय घडत आहे, याचा विचार केला पाहिजे, असे मोलाचे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी त्यांनी सत्ताधारी समाजावर निशाणा साधला. सत्ताधारी समाज हा कायम वंचितांना वंचित ठेवण्यासाठी काम करत असतो, असे मत अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केले. या मेळाव्याला अकोल्यातील आंबेडकरी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती.