खोटारडे आणि फसवे राजकारणी ओळखा
वर्धा : आमच्या हातात सत्ता द्या, आम्ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याचा कायदा केल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वर्धा येथील वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या महाएल्गार सभेत केले आहे.
हमीभावाचा कायदा करायला पाहिजे असे आमचे म्हणणे आहे, जेणेकरून या कायद्याचं उल्लंघन केले, तर त्या व्यापाऱ्यांवर कारवाई करता येईल असेही त्यांनी सांगितले.
जे खोटारडे आणि फसवे आहेत. त्यांच्या हातात पुन्हा पाच वर्षे सत्ता देता कामा नये, हे लक्षात घ्यायला पाहिजे. दिल्लीत शेतकरी आंदोलनाला बसला आहे. आज मजुरांची चर्चाच होताना दिसत नाही. शेतकरी इर्शेला पेटला आहे. कारण, हे लालांच सरकार आहे, या मुद्द्यांकडे लक्ष वेधत सध्याचे सरकार सामान्य माणसाचे नसल्याची टीकाही आंबेडकर यांनी केली.
सभेला लाखो नागरिकांची गर्दी
वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेसाठी वर्धा जिल्ह्याच्या विविध भागातून नागरिक मोठ्या संख्येने आले होते. सभेपूर्वी मैदान भरगच्च भरले होते. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महागाई, शेतमालाला हमीभाव अशा विविध मुद्यांवर आंबेडकर यांनी मुद्देसूद मांडणी केली. त्याचप्रमाणे इडी, सीबीआयची भीती घालून भाजप आणि आरएसएसचे सरकार विरोधी पक्षांना घाबरवण्याचे काम करीत आहे. पक्ष फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. निवडणूक जशी जवळ येईल तसे हे प्रकार वाढतील, असेही आंबेडकर म्हणाले.