नवी दिल्ली: नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीमुळे तरुणाईने पेटून उठत केलेल्या अभूतपूर्व आंदोलनापुढे सरकारला अखेर नमते घ्यावे लागले आहे. या आंदोलनाचा जोर इतका वाढला की, देशाचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. ही ‘GenZ’ (GenZ Revolution) केवळ दोन मिलेनियलच्या (Millennials) हाकेवर सुरू झाली आणि देशाच्या राजकारणाची दिशा बदलून टाकली.
नेपाळ सरकारने 4 सप्टेंबर, 2025 रोजी अचानक सोशल मीडिया साईट्सवर बंदी घातली. यात YouTube, Facebook, X, Instagram आणि WhatsApp सारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मचा समावेश होता. या निर्णयामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला.
दोन पोस्ट्स आणि लाखो तरुण रस्त्यावर
काठमांडूचे महापौर बालेन शाह (Balendra Shah) आणि सामाजिक कार्यकर्ते सुदन गुरुंग (Sudan Gurung) या दोन तरुणांनी या आंदोलनाला योग्य दिशा दिली. दोघांनीही सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट्समुळे तरुणाईमध्ये असंतोष पसरला.
बालेन शाह यांची पोस्ट:
7 सप्टेंबर रोजी, बालेन शाह यांनी VPN चा वापर करून एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी ‘उद्याची रॅली GenZ ची आहे’ असे जाहीर केले. कोणतीही राजकीय व्यक्ती किंवा पक्षाने यात वैयक्तिक फायद्यासाठी सामील होऊ नये, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली. ‘वयामुळे मी स्वतः सहभागी होऊ शकत नाही, पण माझा पूर्ण पाठिंबा आहे,’ असे त्यांनी लिहिले. या एका पोस्टला 20 हजारांहून अधिक शेअर्स आणि 40 हजारांहून अधिक कमेंट्स मिळाल्या. यातून लाखो तरुणाई रस्त्यावर उतरण्यास तयार झाली.
सुदन गुरुंग यांची पोस्ट:
बालेन शाह यांच्या पोस्टनंतर सुदन गुरुंग यांनी आणखी एक पोस्ट करून आंदोलनाला धार दिली. ‘आजचा दिवस असा आहे, जेव्हा नेपाळचे तरुण जागे होतील आणि म्हणतील की खूप झाले. हा काळ आमचा आहे, ही आमची लढाई आहे, जी आमच्यापासून, तरुणांपासून सुरू होते.’ या पोस्टने आंदोलनात अधिक जोश भरला.
नेपाळच्या रस्त्यांवर अभूतपूर्व हिंसा
8 सप्टेंबर रोजी, बालेन शाह आणि सुदन गुरुंग यांच्या आवाहनानंतर लाखो आंदोलक रस्त्यावर उतरले. त्यांनी राष्ट्रपती भवन, पंतप्रधान निवासस्थान आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर दगडफेक केली. परिस्थिती हाताळण्यासाठी सैन्य आणि पोलिसांना गोळीबार करावा लागला, ज्यात 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. 9 सप्टेंबरला, आंदोलन पुन्हा पेटले.
आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान, राष्ट्रपती आणि मंत्र्यांच्या बंगल्यांना आग लावली. सेना आणि पोलिसांकडून शस्त्रे हिसकावून घेतली. या वाढत्या हिंस्र आंदोलनामुळे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना अखेर राजीनामा द्यावा लागला. राजीनामा दिल्यानंतर त्यांना नेपाळच्या सैन्याच्या संरक्षणात सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.