समाज माध्यमात ‘लेख कॉपी’ वरून चर्चा; दलित विद्यार्थ्याला शिफारस नाकारणाऱ्या संस्थापकाचा प्रताप
मुंबई : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आणि मॉडर्न कॉलेजचे अध्यक्ष गजानन एकबोटे हे लेख चौर्याच्या गंभीर आरोपांमुळे नव्या वादात अडकले आहेत. प्रा. दिलीप चव्हाण यांच्या नावाने पूर्वी प्रकाशित झालेला लेख, शब्दशः नक्कल करून एकबोटे यांनी आपल्या नावाने प्रसिद्ध केल्याचा आरोप सोशल मीडियातून करण्यात येत आहे. शिक्षण क्षेत्रात ‘गुणवत्ता’ आणि ‘मेरिट’चा जोरदार पुरस्कार करणाऱ्या एकबोटेंविषयी या वाड्मय चौर्यामुळे मोठी चर्चा रंगू लागली आहे.
उच्च शिक्षणातील पारदर्शकता, मौलिकता आणि गुणवत्तेचे धडे देणारे एकबोटे स्वतःच इतरांच्या लिखाणाची नक्कल करतात, हे उघड होताच शिक्षण वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विद्यार्थ्यांनी अशाच कृती केल्यास कठोर शिक्षांचा सामना करावा लागतो; मग महाविद्यालयाचे अध्यक्ष अशी कृती करतात तेव्हा ती नक्कल नाही का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.
दलित विद्यार्थ्याची शिफारस नाकारलीया वादासोबतच मॉडर्न कॉलेजने केलेली आणखी एक कारवाई चर्चेत आली आहे. प्रेम बिऱ्हाडे या तरुणाला परदेशात नोकरी मिळाल्यानंतर फक्त “तो आमच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे” एवढी साधी शिफारस महाविद्यालयाकडून मागण्यात आली होती. मात्र, कॉलेजने कोणतेही ठोस कारण न देता ही शिफारस देण्यास नकार दिला. परिणामी, बिऱ्हाडे यांची परदेशातील मिळालेली नोकरी रद्द झाली. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य हिरावून घेण्याइतका कठोर प्रशासन, आणि त्याच वेळी स्वतः मात्र इतरांच्या लेखांची हुबेहूब नक्कल करणे या दोन्ही गोष्टींवर तीव्र टीका होत आहे.
गजानन एकबोटे हे शल्यचिकित्सक असून, PES संस्थेअंतर्गत ५६ शैक्षणिक संस्था चालविल्या जातात. ते महाराष्ट्र हेल्थ सायन्सेस विद्यापीठाचे प्रो-व्हाइस चॅन्सलर आणि केंद्र सरकारच्या नियोजन आयोगातही पदावर कार्यरत होते. अशी प्रशासकीय व शैक्षणिक प्रतिमा असलेल्या व्यक्तीकडून झालेल्या या दोन घटना विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रासाठी चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
लेख चौर्य, विद्यार्थ्याची शिफारस नाकारणे व त्यातून नोकरी जाणे या घटनांमुळे मॉडर्न कॉलेजच्या निर्णयप्रक्रियेवर आणि एकबोटे यांच्या नैतिक भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी उभ्या राहणाऱ्या संस्थाच विद्यार्थ्यांना धोका पोहोचवत असतील, तर उच्च शिक्षणातील पारदर्शकतेचा पाया कमकुवत झाल्याची प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून येत आहे. दरम्यान, एकबोटे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.





