दिवा ते CSMT लोकल सुरू करण्यासाठी १ जुलैपासून समाजसेविका सौ. अश्विनी अमोल केंद्रे यांच्या धरणे आंदोलनाला पाठिंबा देत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते विकास इंगळे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.
उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांच्या प्रकृतीत घसर झाल्याने डॉक्टरांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले, परंतु त्यांच्या प्रकृतीची चिंता कायम आहे. याविषयी समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांनी संताप व्यक्त केला असून, “रेल्वे प्रशासन आणि राजकीय पक्ष अद्यापही गप्प आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी आता झोपेतून जागं व्हावं आणि रेल्वे प्रशासनाला जाब विचारावा. श्रेयवाद थांबवा आणि लोकल सेवा कधी सुरू होणार हे जाहीर करा,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी म्हटले. २०१४ पासून केवळ निवडणुकीच्या तोंडावर आश्वासन दिले जात असले तरी, प्रत्यक्षात लोकल सेवा सुरू झालेली नाही. “आमचा लढा कोणत्याही पक्षाविरोधात नसून फक्त दिवा-CSMT लोकल सुरू करण्यासाठी आहे आणि तो सुरूच राहणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.