कर्जमाफीच्या आश्वासनावरून वंचित बहुजन आघाडीची सरकारवर टीका
अहमदनगर – जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वडुले गावात बाबासाहेब सुभाष सरोदे या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. कर्जमाफीची प्रतीक्षा करत असलेल्या सरोदे यांनी सरकारकडून कोणतीही मदत न मिळाल्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण यांनी सरोदे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यांच्या सोबत नेवासा तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे, शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
प्रा. चव्हाण यांनी यावेळी बोलताना फडणवीस सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी सांगितले की, “हे सरकार जनतेला केवळ आश्वासनांच्या भूलथापांमध्ये अडकवते. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या जिवावर बेतले आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे बळी घेणारे खुनी सरकार आहे.”
या घटनेने वडुले गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.