सध्या उत्तरप्रदेश, गोवासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडे आगामी लोकसभेची मिनी निवडणूक म्हणून पाहिले जात आहे. हे संपादकीय प्रसिध्द होईपर्यंत काही टप्प्यांचे मतदान झालेले असेल. त्यानंतरच्या निकालावर यथावकाश लिहूच. त्याच कालावधित निवडणूकपूर्व निकालांचे अंदाज प्रसिध्द झाले; त्यात एखाद दुसरा अपवाद सोडल्यास बहुतांश अंदाजांप्रमाणे सत्ताधारी संघ-भाजपला मिळणारे मतदान, त्याच्या जिंकलेल्या जागा आधीपेक्षा कमी झालेल्या दिसतात. त्यांचे काही मित्र जय श्रीराम ऐवजी रामराम करू लागले आहेत. आता संघ-भाजपनंतर आपोआप कॉंग्रेसच सत्तेवर येईल ,अशा वल्गनाही सुरू झाल्या आहेत. तो पक्षही जोरात पळू लागल्याचे भासवू लागलाय. दुस-या बाजूला संघ-भाजपचे गुजरात माणसेमार प्रसिध्द हिंसाचारी-मॉडेल सम्राट त्यांच्या नियोजनाप्रमाणे दौडू लागले! आधीच्या संपादकीयांत म्हटल्याप्रमाणे त्यांचा विद्वेषी, हिंसाचारी पॅटर्न सुरू झाला! अनेक खटपटी-लटपटीनंतरही फारसे चित्र बदलत नाही हे पाहिल्यावर आता कर्नाटकचे हिजाब प्रकरण पुढे आले आणि नेहमीप्रमाणेच ब्रेकिंग न्यूजवाली टि.व्ही. चॅनल्स काहीतरी महान शोध लागल्यागत दिवसा-रात्री-बेरात्री कोकलू लागली! आता भारतातील कोरोना कमी होवू लागला आणि केवळ एकच महा-महाप्रश्न म्हणजे हिजाब! तमाम मुस्लीम विद्यार्थिनी-स्त्रियांनी त्यांचे बुरखे फेकून-तोंड उघडे ठेवून गुंडाळलेले रंगीबेरंगी कापड काढले की, भारतातील सर्व प्रश्न मिटले. बेरोजगारी, महागाई, भाववाढ, शिक्षण-आरोग्याचे प्रश्न म्हणून गरिबी गेली, असा समज करून देत आहेत. बालवयात शाळेत जे मनात पेरले; ते अगदी अचूक उगवले आहे. विद्यार्थी विद्वेषाने बेफाम झाले आहेत! आणि देशभर धर्माचे ठेकेदार व सत्ताधारी आपापल्या फायद्याची गणितं मांडत बसले आहेत.
दिल्लीतील मुस्लिमांची तबलिगी, त्यांनी लस न घेतल्यामुळे कोविड-१९ चा फैलाव झाला, इ. खोटा प्रचार करूनही संघाला अपेक्षित परिणाम दिसत नव्हता. या काळात हजारो कोटी घेवून बहुतांश गुजराती व्यापारी बॅंका लुटून परदेशी अगदी विनासायास पळून जात आहेत. परवा बॅंक घोटाळ्यांच्या इतिहासात गुजरातच्या कर्ज बुडवे पॅटर्नच्या एका कंपनीने अनेक बॅंकांना चुना लावल्याचे उघड झाले आहे! जर्मनीचा हुकूमशहा हिटलर ज्यूंचा छळ करून ठार मारत असे. आता प्रत्यक्ष हिंसेबरोबरच बॅंकांमधील भारतीयांचे कष्टाचे पैसे सहज लुटत आहेत. असे दुहेरी नियोजनबध्द विकसित-सॉफिस्टिकेटेड हत्यांकांड सुरू झालेले आहे. गांधीच्या मारक-याचे उघडपणे कोडकौतुक ऐकत, स्वत:ला गांधीवादी म्हणवणारे आण्णा जागे होवून परत उपोषणाची भाषा करू लागले आहेत! मागील काही वर्षांत मेड इन भारत असे पतंजली उत्पादनांवर लिहीणारे, मात्र स्वत:ला हिंदुस्थानी म्हणत, वा-याप्रमाणे पाठ फिरविणारे रामदेव बाबा हळूच मोदी सरकारच्या काही धोरणांविरुध्द सोयीने बोलूही लागले आहेत. आताची सत्ता गेली, तर ती परत येण्याची शक्यता कमी, म्हणून आताच ऊठा, लुटा, विका, गुंडाळा, हिंसाचारात जाळा पण रेटून खोटे बोला! या षटकोनीनीतिने सारे व्यवहार सुरू आहेत!
हे संपादकीय लिहीत असतानाच टि.व्ही.वर एक बातमी आली शेरोंज कॅफे : जगून पुढे पुढे जाण्याची आशा! उत्तर प्रदेशमध्ये आग्रा आणि लखनौला हे कॅफे सुरू आहे. विविध ठिकाणच्या ऍसिड हल्ल्यात जखमी होऊन चेहरा विद्रुप झालेल्या विविध भाषिक, तरुण मुली हे कॅफे चालवितात. जागतिक भांडवलशाही आणि प्रचंड जीवघेण्या स्पर्धेच्या कालखंडात न हरता जगण्याची नवी उमेद घेवून टाकलेले मुलींचे हे पाऊल म्हणजे दर्यामें खसखस आहे. परंतु, निवडणूक निकालाबरोबरच कोणत्याही क्षेत्रात हिच जगण्याची, शिकत शिकत उघडे-नागडे वास्तव स्वीकारून, व्यवस्थेचा आत्महत्येचा घातक, अराजकीय पर्याय न स्वीकारता, मन मरू न देता पुढे जाण्याची वृत्ती हवी. व्यक्तिगत आणि सामूहिक समाज जीवन असेच संघर्ष करत जगायचे आहे. बाबासाहेब म्हणतात तशी क्रांती-प्रतिक्रांती ठरलेलीच आहे. प्रस्थापित व्यवस्था कायम ठेवणाऱ्या स्थितिवादी शक्ती आणि व्यवस्था विरोधी क्रांतिकारक शक्ती यामधील संघर्ष अटळ, अपरिहार्य आहे! जशी या मुलींनी तमाम हिंसक, विकृत पुरुषी वृत्तीला जोरात थप्पड मारली आहे; तशीच सन्मानजनक उपजीविका व जगण्याच्या जबर राजकीय ईर्शेने वंचित बहुजनांनी आपल्या हातात राज सत्ता घेण्याची पावले टाकायला हवीत. शेवटी प्रश्न कोणताही असो; त्याची सोडवणूक ही राजसत्तेच्या हातीच असते, हे वारंवार दिसते आहे. अत्याचारित, निसर्ग पीडित, सरकारी धोरण-प्रकल्प विस्थापित सर्वच घटकांच्या सन्मानजनक जगण्याच्या भारतीय राज्यघटनेच्या अधिकाराबाबत सरकारांनी योग्य दिशेने उद्दिष्टे-धोरणे व कार्यक्रम आखण्यासाठी शेरोंज कॅफे हे उत्कृष्ट उदाहरण आहे हे नक्कीच. पण, हे काम एकट्या एनजीओंचे नाही. तेथे सत्ताच हवी!
बाबासाहेब म्हणतात, तसे आपण नेशन बनण्याच्या प्रक्रियेत आहोत. त्यासाठी भारतीय राज्यघटना, त्यातील लोकशाहीसह विविध मूल्ये, व्यवस्था प्रत्यक्षात उभ्या राहणे खूपच महत्त्वाचं आहे. आताची घटना मारून संघाच्या नियोजनातील तथाकथित घटना अस्तित्वात आणणे म्हणजे गोंडस एकचालकानुवर्ती म्हणजे वर्चस्ववादी ब्राह्म-क्षत्रियत्वाखाली सर्व व्यवस्था उभ्या करणे. अगदी पुरोगाम्यांसह बहुसंख्यांक वंचित बहुजनांच्या परावलंबी एकी, एकत्वाचा संघाला खूपच सोस आहे. भारतीय नागरिकांना आपापसात विश्वासार्ह, निर्भय संवाद करण्यास कोणताही अडथळा न आणणारे धार्मिक स्वातंत्र्य राज्यघटनेत नमूद आहे. यात भाषा-संस्कृती, खाणे, पोषाक, रंग, जात, स्त्री-पुरुष, प्रांत, धर्म, आदी घटक येतात. या सर्वांमध्ये परस्पर सौहार्दपूरक व्यवहार व्हायला काहीही हरकत नाही. पण, यानिमित्ताने जर कुणी भेदभाव करत असेल, तर ते घटनेला अमान्य आहे.
शिक्षणाच्या स्वत:च ठरविलेल्या राखीव अधिकारामुळे आधीपासून व १९२५ पासून तर जाणीवपूर्वक रा.स्व.संघाने प्रशासनासह सर्व मानवी क्षेत्रांत यशस्वी शिरकाव केलेला आहे. खास करून विविध संस्थांच्या प्रशासनात दबा धरून त्यांच्या प्रथमदर्शनी गोंडस वाटणा-या घातक एकत्वाचा धोशा लावला आहे. सर्व शासकीय-बिगरशासकीय संस्थांमध्ये अगदी घराघरात त्यांच्या विषमतावादी व लोकशाहीविरोधी संस्कृतीचा प्रभाव दाखवत आहेत. संघ शाखा हे फक्त एक छोटे टोक आहे! कधीही संघ शाखेत न गेलेले वंचित बहुजन कुटुंब या संघ संस्कृतीचे कट्टर वाहक बनले आहेत. तेच कर्नाटकसारख्या घटनांमध्ये प्रभावी आहेत. जवळ जवळ प्रत्येक घर हे संघ शाखा बनवले गेले आहे!
सर्व सामान्य सर्वधर्मीय शेतकरी-शेतमजूर-भटके-विमुक्त-बौध्द, आदी धर्म जातींमध्ये उन्हाळा-हिवाळ्यात डोक्याला गमछा, टॉवेल गुंडाळायची सहज, सोपी परंपरा आहे. धूळ, धूर, रसायने, कडक ऊन, प्रदूषण, आदींपासून बचाव करण्यासाठी सर्वच स्त्रिया, शाळा-कॉलेजच्या मुली आपला दुपट्टा खूपच चांगल्या पध्दतीने गुंडाळून तोंड-डोके-कान-नाक झाकत असतात. अनेक जाती-धर्मातील स्त्रिया डोक्यावरच नाहीतर संपूर्ण तोंड झाकले जाईल, असा पदर घेत असतात. पण, यांना कुणी हरकत घेत नाहीत. मग, हिजाबच्या नावाने सर्वांना कळलेल्या मुस्लीम परंपरेला विरोध का?
संघ-भाजपचे विकृत एकत्व, सर्वसामान्यांना अजिबात न कळणा-या शासकीय परिभाषेच्या नावाखाली भारतातील वंचित बहुजनांच्या सहज सुंदर, समृध्द बोली भाषा मारल्या जात आहेत. स्वत:च्या आईच्या भाषेविषयी न्यूनगंड निर्माण केला गेला आहे. शुध्द-अशुध्द, पवित्र-अपवित्र तेच्या संकल्पना लादल्या गेल्या आहेत. खाणे-पोषाखांतील विविधता, सुंदरता मारून टाकण्याचा प्रकार म्हणजेच कर्नाटकचे हिजाबविरोधी प्रकरण! सर्वसामान्यांचा घराघरातील रामराम जावून त्याजागी जय श्रीराम येणे हा त्याचाच घातक डाव आहे. शिक्षण तर हवेच. पण कोणते? मूल्य शिक्षण कोणते? आपल्या शिक्षण व्यवस्थेतून शिकून बाहेर आलेला / ली विद्यार्थी / विद्यार्थिनी हा विद्वेष, जातीवाद डोक्यात घेऊनच बाहेर येतो. हा सारा संघाचा नियोजनबध्द एकत्वाचा राजकीय डाव आहे! भारतीय राज्यघटनेनुसार प्रशिक्षित माणूस अजून निर्माण व्हायचा आहे! प्रबुध्द भारत, प्रबुध्द माणूस बनण्याची प्रक्रिया सध्या चुकून एखाद्या माणसापुरतीच सीमित बनून राहिली आहे.
भारताचा सारा इतिहास असाच विकृत, पुरुषी-ब्राह्म-क्षत्रिय वर्चस्वाचा लिहीला गेला आहे. ज्यांना आदर्श इतिहास शोधक, सुंदर आवाज-गायकीचा आदर्श मानले गेले; तेच कसे हिंदू महासभा पर्यायाने संघाचे, गोडसेचे समर्थक आहेत हे दाबून ठेवलेले सत्य आता समोर येत आहे. तरीही केतकरादींचे संशोधन, त्यांची शोधक वृत्ती, अतिसुंदर आवाज-गाणे नक्कीच प्रशंसनीय आहेच. त्यांच्या मृत्यूनंतरही ते कायम कौतुकास्पद राहील. पण, वर्ण-जात हे वास्तव असल्यामुळे त्याची छाप सर्वांवरच आहे. काहींना त्याचे चटके बसताहेत; तर काहीना त्याचा लाभ होत आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या नजरेतून याकडे पाहिले तर यातील फोलपणा दिसून येतो. नेमकी हीच अडचण संघ-भाजपला वाटत आली आहे. म्हणून त्यांना भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही एकत्रच हवी आहे. स्रीशूद्रातिशूद्र वर्ग-जातींचा विद्वेष, पिळवणूक व अत्याचार ही याचेच उदाहरण आहे. भारतीय क्रांतीची परिभाषा स्वतंत्रच आहे. तिला जगाच्या नजरेतून पहाण्यापेक्षा भारतासारख्या गरीब देशांतील कष्टकरी जनतेच्या नजरेतून सा-या जगाकडे पाहण्याची गरज परत परत जाणवते आहे. कबीर-तुकाराम-फुले-आंबेडकर ही याची आदर्श उदाहरणे आहेत.
परशुरामाने २४ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली ही कथा सांगतानाच क्षत्रिय म्हणवून घेणारेच ब्राह्मणी संस्कृतीचे मुख्य वाहक कधी बनले हे त्यांना समजलेच नाही. भारतीय भांडवलशाहीने जागतिक नियम पाळतच येथील ब्राह्मणशाहीचा रंग कधी फासला आहे! त्यामुळे राज्यघटना स्वीकारल्यानंतरही कुप्रसिध्द चुंदूर, वेडछी, बावडा, नामांतर, मंडलविरोधी हिंसाचार, ब्राह्मणगांव, भागलपूर, पाल, ओरिसाचे फादर स्टेन व त्यांचा निष्पाप मुलगा जिवंत जाळणे, दिल्लीची निर्भया, कोपर्डी, मनिषा वाल्मिकी, डॉ. पायल, हैद्राबादच्या सहा वर्षांच्या मुलीवरील बलात्कार व खून प्रकरण, दिल्लीतील मुस्लिमांविरोधी खूनशी हिंसाचार, बाबरी उदध्वस्तीकरण, आंबेडकरभवन उदध्वस्त करणे, भिमा कोरेगांव, आदी प्रकरणे ही याच वृत्तीची साक्ष देतात. संघाबरोबरच आधी व आताही काही कॉंग्रेसवाल्यांचे बलात्कारांचे खुले समर्थन करणे; ही पण याचीच लक्षणे आहेत. जिकडे सत्ता, तिकडे माकड उडी मारणे राजकारणातील हे पण असेच उदाहरणे आहे!
शांताराम पंदेरे
मोबा. ९४२१६६१८५७