सातारा : फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणाने महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देखील या प्रकरणात संताप व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देण्याची तसेच विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी ‘एक्स’ हँडलवरून या संदर्भात ट्विट केले आहे.
माजी खासदाराच्या पीएवर दबाव टाकल्याचा आरोप
ॲड. आंबेडकरांनी फलटण येथील घटनेला ‘अत्यंत चीड आणणारी घटना असे म्हटले आहे. या प्रकरणात माजी खासदाराच्या पीएने डॉक्टर तरुणीवर दबाव टाकला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित खासदाराला क्लिनचिट दिल्याचा गंभीर आरोप आंबेडकर यांनी केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांना सवाल
१) खासदारांच्या पीएने डॉक्टर तरुणीला फोन केला होता की नाही?
२) ते (देवेंद्र फडणवीस) स्टेटमेंट करण्याआधी मोबाईलचा रेकोर्ड चेक केला होता का?
यापूर्वीच्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा उल्लेख करत, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात खोटी माहिती दिली आणि कोणत्याही विरोधी पक्षाने हक्कभंगाचा ठराव आणला नाही, याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मृत डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांशी फोनवर संपर्क साधून सांत्वन केले. पीडित कुटुंबाने या प्रकरणी SIT चौकशीची मागणी केली असून, वंचित बहुजन आघाडीचेही या मागणीला समर्थन असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.






