अकोला : अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागासाठी (SNCU) 2024-25 मध्ये झालेल्या निविदा प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार उघड झाल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन युवा आघाडीने केला आहे. प्रशासकीय अधिकारी ए. एन. डांबरे यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे आणि अधीक्षक डॉ. जयंत पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
या संदर्भात आरोग्य उपसंचालक यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद केल्यानुसार, निविदा प्रक्रियेत अपारदर्शकता, निकषांचे उल्लंघन आणि आपल्याच निकटवर्तीयांना कंत्राट देण्याचे प्रकार घडले. चौकशी अहवालानुसार 72 निविदांपैकी केवळ 4 निविदा अंतिम करण्यात आल्या असून त्यातही दोनच अधिकृत आहेत. उर्वरित सर्व प्रक्रिया शंका निर्माण करणारी आहे. प्रशासकीय अधिकारी ए. एन. डांबरे यांच्यावर अनेक आर्थिक घोटाळ्यांचे आणि फसवणुकीचे आरोप असून, त्यांनी अनेक बेरोजगार युवक व महिलांकडून नोकरीच्या आमिषाने पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. डांबरे हे अनेक वर्षांपासून रुग्णालयात भ्रष्ट पद्धतीने काम करत असून त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संरक्षण असल्याचा आरोपही करण्यात आला.
वंचित बहुजन युवा आघाडीने मागणी केली की, या तिघांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, कॉल डेटा तपासून अन्य सहआरोपींची माहिती घ्यावी व संपूर्ण निविदा प्रक्रिया, खरेदी व कंत्राट वाटपाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही, तर पुढील आठवड्यात पक्षाचे राज्य महासचिव राजेंद्र भाऊ पातोडे यांच्या नेतृत्वात आरोग्य संचालक कार्यालयात अघोषित आंदोलन छेडण्यात येईल, तसेच उपसंचालकांनाही सहआरोपी करण्याची मागणी करत वंचित स्वतः गुन्हा दाखल करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी उपस्थित प्रमुख कार्यकर्ते : जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महानगर अध्यक्ष वैभव खडसे, सचिन शिराळे, आकाश सं. गवई, जय तायडे, साहिल बोदडे, सुरज दामोदर, आकाश जंजाळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. छुप्या आंदोलनाची योजना : उपसंचालक कार्यालयात ५ कार्यकर्ते भेटीसाठी गेले असता उर्वरित ५० कार्यकर्ते विधी महाविद्यालयाजवळ काळा रंग घेऊन तयार होते. मात्र उपसंचालक अनुपस्थित असल्याने कार्यालय घेरावाचा प्रयत्न अपूर्ण राहिला.