काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदार संघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत धुसफूस असल्याची माहिती समोर येत आहे. ही जागा काँग्रेसलाच मिळावी याचा रेटा वाढवण्यासाठी जिल्ह्यातील चार तालुक्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे देवून दबाव तंत्राचा वापर केला आहे.
जागावाटपात शिवसेना ( उबाठा ) यांनी जोर वाढवल्याने हा मतदार संघ ठाकरे गटाला मिळाला आहे. मात्र, काँग्रेसच्या अंतर्गत हा मतदार संघ काँग्रेसला मिळावा म्हणून मागणी होत आहे, यावरून महाविकास आघाडीमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे चित्र आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर देखील आपल्या पत्रकार परिषदांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उबाठा) यांच्यामध्ये 15 जागांवरून वाद असल्याची माहिती वारंवार देत होते. आता बुलढाणा येथील या घटनेवरून बाकी 14 जागा कोणत्या असा प्रश्न जनसामान्यांना पडलेला आहे. महाविकास आघाडीत जागावाटपावरून धुसफूस सुरू आहे हे आता स्पष्ट होत आहे.