गोवंडीतील खड्डेमय रस्त्यांवर व नाल्यांच्या दुर्दशेवर वंचित बहुजन महिला आघाडीचे तीव्र आंदोलन; महापालिकेला इशारा “खड्डे बुजवा नाहीतर अधिकाऱ्यांना खड्ड्यात घाला!”
मानखुर्द विधानसभा (गायकवाड नगर)गोवंडी (एम विभाग) येथील पी. एल. लोखंडे मार्गावरील महापालिकेच्या रस्त्यांची दुरवस्था आणि नाल्यांची सफाई न झाल्यामुळे संतप्त वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने आज जोरदार आंदोलन करण्यात आले.
महिलांनी खड्डेमय रस्त्यांवर आणि तुंबलेल्या नाल्यांवर निषेध करत महापालिकेच्या निष्काळजीपणावर ताशेरे ओढले. “हे केवळ गोवंडीची समस्या नसून संपूर्ण मुंबई खड्डेमय रस्ते आणि घाणीने भरलेले नाले सहन करत आहे,” असा संताप महिला आघाडीने व्यक्त केला.
या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई महासचिव शारदाताई गायकवाड यांनी केले. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “महिन्याभरात महापालिकेने खड्डे बुजवले नाहीत आणि नाले स्वच्छ केले नाहीत, तर आम्ही महापालिकेच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांना खड्ड्यात बसवू!”
यावेळी जयश्री शिरोडकर, निलम कांबळे, नंदा गोतपागार आणि इतर महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आंदोलनादरम्यान परिसरात संतप्त वातावरण होते आणि स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनाला भरभरून पाठिंबा दिला.