संजीव चांदोरकर
तरुणांनो, सावध ऐका पुढच्या हाका!
“डिजिटल”, बिग डेटा कंपन्यांची मक्तेदारी अधिक खतरनाक आहे.
क्लासिकल भांडवलशाहीच्या केंद्रस्थानी परस्परांशी पारदर्शी स्पर्धा करणारे उत्पदक असतात. असले पाहिजेत. सध्याचे युग मक्तेदारी भांडवलशाहीचे आहे. मक्तेदारी प्रणाली अँटी कॅपिटॅलिझम आहे.
आतापर्यंत माहित असलेल्या “मक्तेदाऱ्या” मूर्त स्वरूपातील माल-सेवांच्या मार्केटवर एकाधिकार गाजवायच्या. नवीन “डिजिटल” , बिग डेटा मक्तेदाऱ्या माणसाच्या “अमूर्त” मनावर अधिराज्य गाजवू लागल्या आहेत.
आपल्याला वाटत असते कि “मी” विचार करत आहे, “मी” माझ्या आवडी-निवडी स्वतःहून ठरवत आहे; पण आपल्यातील त्या “मी”ला, आपल्या नकळत “मॅनिप्युलेट” करण्याची यंत्रणा त्यांच्या हातात तयार होत आहे.
याचे परिणाम अर्थव्यवस्थेपुरते मर्यादित राहणे अशक्य; त्याचे सामाजिक व राजकीय परिणाम अधिक गंभीर असणार आहेत.
गुगल, युट्युब, फेसबुक, बिग डाटा कंपन्यांची मक्तेदारी स्थापन झाली आहे. खालील आकडेवारी पहा
सर्च इंजिन : गुगलचा वाटा ९० टक्के
ऑनलाईन व्हिडीओ : युट्युब ९२ टक्के
मेसेजिंग : व्हाट्सअप : ४७ टक्के
युपीआय पेमेंट : जीपे (गुगल) आणि फोनपे (वॉलमार्ट) एकत्रित ८० टक्के
ऑनलाईन रिटेल खरेदी : ऍमेझॉन / फ्लिपकार्ट : ८० टक्के
मोबाईल सेवा : एअरटेल आणि जिओ : ८० टक्के
(ही यादी परिपूर्ण नाही)
तत्वतः एखादी नवीन कंपनी व स्टार्टअप त्यांच्या धंद्यातील काही हिस्सा आपल्याकडे खेचू शकते. नाही असे नाही. पण आपल्याकडे असणाऱ्या व सतत वाढणाऱ्या वित्तीय ताकदीच्या जोरावर, अशा भविष्यात आपल्याला आव्हान देऊ शकणाऱ्यांना “मुह मांगा दाम” देऊन विकत घेण्याची रणनीती या दादा कंपन्यांची असते.
या साऱ्या कंपन्या एकत्रितपणे कोट्यवधी लोकांनी काय पहायचे, काय वाचायचे, कोणते संगीत ऐकायचे यावर प्रभाव टाकून आहेत. त्या आपल्या आवडी निवडी काय, आपले सामाजिक / राजकीय विचार काय याचा माग ठेवू पाहतात.
आर्टिफिशीयल इंटीलिजन्स या बिग डेटा कंपन्यांची आपल्याला मॅन्युप्युलेट करण्याची ताकद काही पटींनी वाढवणार आहे.
तुमच्या लॅपटॉप व मोबाईल पर्यंत एक अदृश्य “पाईपलाईन” त्यांनी टाकली आहे. ज्यातून हजारो Gigabytes डाटा (शब्द, आवाज, चित्रे इत्यादी ) येत-जात असतो. त्या पाइपलाइनला तुम्हाला माहित देखील नसणाऱ्या अदृश्य “तोट्या” देखील आहेत. त्या तोट्या ते हव्या तेव्हा पिळून, पाइपलाइनमधील प्रवाह अंशतः किंवा पूर्णपणे नियंत्रित करू शकतात. आणि अंतिमतः तुमचे मन !
तुमचा आमचा व्यक्तिगत डेटा आता मार्केटमध्ये किंमत असणारी एक कमोडिटी झाली आहे. ज्याची खरेदी विक्री होत असते
हे जे काही घडत आहे त्यावर जेव्हढा खोलवर विचार करावा तेव्हढ नर्व्हस व्हायला होतंय. कारण हे प्रकरण शुद्ध आर्थिक नाही. ते सामाजिक / राजकीय प्रकरण आहे
विरोधाभास हा आहे की या कंपन्यांवरची राजकीय टीका इतरापर्यंत पोचवण्यासाठी देखील याच कंपन्यांचा प्लॅटफॉर्म मी वापरत आहे. पण त्यामुळे वर उल्लेख केलेल्या परिस्थितीचे गांभीर्य कमी होणारे नाही. आज टीनएज मध्ये / शाळा / कॉलेज मध्ये असणारी, तिशी / चाळिशीतील पिढीला या प्रश्नाला भिडावे लागेल. कारण दुसरा चॉईस नसेल.






