नाशिक : साहित्यिक, अभ्यासक आणि समीक्षक डॉ. नितीन भरत वाघ यांच्या अकस्मात निधनाने मराठी साहित्यविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. बुद्ध आणि आंबेडकरी तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक तसेच संवेदनशील कादंबरीकार म्हणून त्यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते.
‘झेन’, ‘निळावंती’ यांसारख्या कादंबऱ्यांमधून त्यांनी वाचकांच्या मनात घर केले, तर ‘हिंदू-मुगल सांस्कृतिक समन्वय’ हे त्यांचे संशोधनात्मक कार्य प्रकाशित होण्याआधीच त्यांच्या निधनाने अपूर्ण राहिले. हे साहित्यविश्वासाठी एक मोठे नुकसान ठरले आहे.
सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णपणे साहित्य आणि अभ्यासाला वाहून घेतलेल्या डॉ. वाघ यांच्या निधनाने विचारविश्व आणि साहित्यविश्वाचीही अमूल्य हानी झाली आहे.त्यांच्या अकस्मात जाण्याने लेखक, वाचक आणि साहित्यिकांमध्ये शोककळा पसरली असून अनेकांनी सामाजिक माध्यमांवर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.