उत्तर प्रदेश : रायबरेली येथील ऊंचाहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे चोरीच्या संशयावरून हरिओम नावाच्या एका दलित युवकाला जमावाने बेदम मारहाण केली, ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ॲड. प्रकाश आंबेडकरांची तीव्र प्रतिक्रिया :
या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडल X वर ट्विट केले आहे की, “त्याचा ‘गुन्हा’ हा नव्हता की त्याला चोर समजण्यात आले होते. त्याचा गुन्हा एवढाच होता की तो दलित होता! न्याय मिळाला पाहिजे!” ॲड. आंबेडकर यांनी या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होऊन हरिओम याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऊंचाहार येथे हरिओम या दलित तरुणाला चोर समजून काही लोकांनी पकडले आणि त्याला क्रूरपणे मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
पोलिसांनी या घटनेची घेतली असून, एफआयआर दाखल केला आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून, त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
तसेच या गंभीर घटनेत हलगर्जीपणा केल्यामुळे ऊंचाहार पोलीस स्टेशनच्या प्रभाऱ्यासह (कोतवाल) चार अन्य पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्य आणि नियमांचे पालन न केल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.